भारतीय संघातील गोलंदाजांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कामगिरी फार काही चांगली झालेली नाही. जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सर्व भार आलेला दिसतोय. त्यामुळे अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला तातडीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बोलवावे, अशी मागणी जोर धरत होती. पण, बीसीसीआयने या सर्व शक्यता, मागण्या फेटाळून लावल्या आहेत.
बीसीसीआयने आज शमीच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले. त्यांनी ट्विट केले की, सेंटर ऑफ एक्सलन्स येथील BCCI वैद्यकीय संघ मोहम्मद शमीच्या उजव्या टाचांच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्वसनावर काम करत आहे. टाचांच्या या समस्येतून शमी पूर्णपणे बरा झाला आहे.
त्याने नोव्हेंबरमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत मध्य प्रदेशविरुद्ध बंगालकडून झालेल्या सामन्यात ४३ षटकं टाकली होती. यानंतर तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) च्या सर्व नऊ सामन्यांमध्ये खेळला होती. त्यानंतर कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने अतिरिक्त सराव सत्रातही सहभाग घेतला होता. पण, त्याच्या डाव्या गुडघ्याला किरकोळ सूज आली आहे. त्याच्या बॉलिंग वर्कलोडमुळे ही सूज वाढली आहे. बऱ्याच कालावधीनंतर एकदम एवढी गोलंदाजी केल्यामुळे हे झालं आहे आणि तो त्यातून बरा होईल, असे बीसीसीआयने सांगितले.
बीसीसीआयने पुढे म्हटले की, वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्याच्या गुडघ्याला पूर्णपणे ठिक होण्यासाठी आणखी वेळ आवश्यक आहे. असे BCCI वैद्यकीय टीमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड करणे योग्य ठरणार नाही.
शमी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली strength आणि conditioning वर काम करत आहे. त्याच्या गुडघ्याच्या प्रगतीवर त्याचा विजय हजारे ट्रॉफीतील सहभाग अवलंबून असेल. मोहम्मद शमीने ६४ कसोटी सामन्यांत २२९ विकेट्स घेतल्या आहेत आणि तो ११ जून २०२३ मध्ये शेवटची कसोटी खेळला होता.