मोहम्मद शमी, नसरीन शेख आणि मो. हिसामुद्दीन
केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३ ची घोषणा केली. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी विविध १९ क्रीडाप्रकारांमधील २८ खेळाडूंना क्रीडा पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.मागील चार वर्षांमध्ये क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी खेळाडूंना हे पुरस्कार दिले जातात. यापैकी ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीसाठी तर ‘अर्जुन पुरस्कार’ उत्कृष्ट कामगिरीसोबतच नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती आणि शिस्तपालन यासांठी दिला जातो.
यावर्षी एकूण २८ खेळाडूंपैकी २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, दोन खेळाडूंना खेलरत्न देऊन गौरवण्यात येईल. यातील तीन नावे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. २०२३ च्या विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाज मोहम्मद शमी, बॉक्सिंग विश्वचषकासाठी निवड झालेला २९ वर्षीय मोहम्मद हुसामुद्दिन आणि राष्ट्रीय महिला खो-खो टीमची कर्णधार नसरीन यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘अर्जुन पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मोहम्मद शमीच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे
२०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत फलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या द्रुतगती गोलंदाज मोहम्मद शमीने २०१३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आतापर्यंत त्याने १०० एकदिवसीय सामन्यांमध्ये१९४ बळी घेतले. ६४ कसोटी सामन्यांमध्ये २२९ बळी मिळवले आहेत. टी-२० मध्येही शमीने २३ मॅचमध्ये २४ बळी मिळवले आहेत.
बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दिनच्या कर्तुत्वाचा गौरव
तेलंगणातील मोहम्मद हुसमुद्दिनचे वडील आणि दोन्हीभाऊ बॉक्सर होते. मोहम्मद हुसामुद्दीनची २०२३ च्या विश्वचषकासाठी निवड झाली होती. या चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदक पटकावले होते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्याने कांस्यपदक जिंकले. तर २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ही पुरुषांच्या ५७ किलो फेदरवेट प्रकारात कांस्यपदकावर स्वतःच्या नावाची मोहर उमटवली होती.
खो-खोपटू नसरीनच्या नेतृत्वगुणांचाही होणार सन्मान
भारतीय खो खो संघाची कर्णधार नसरीन शेख मुळची दिल्लीची. २०१९ मध्ये तिच्या नेतृत्वाखाली भारतीय खो-खो संघाने सुवर्णपदक जिंकले. आतापर्यंत तिने जवळपास ३५ राष्ट्रीय आणि २०१६ आणि २०१८ च्या आशियाई खेळांमध्येही भाग घेतला आहे. ‘खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया’ नसरीनच्या जीवनावर सिनेमा बनवणार आहे. खेड्यापाड्यातील मुलांना प्रेरणा देणे आणि त्यांना खो-खो या अस्सल देशी खेळाकडे आकर्षित करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
हे आहेत ‘क्रीडा पुरस्कार २०२३’चे मानकरी
क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार'साठी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकी रेड्डी या दोन बॅडमिंटनपटूंची निवड करण्यात आली आहे. तर 'अर्जुन पुरस्कारा'साठी ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), श्रीशंकर (अॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सर), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल (अश्वशक्ति), दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी), नसरीन शेख (खो-खो), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (शूटिंग), ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), अनंत (कुस्ती), रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), अजय कुमार (अंध क्रिकेट), प्राची यादव ( पॅरा कॅनोइंग) या २६ खेळाडूंची निवड करण्यात आली.