भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने जवळपास वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मोहम्मद शमी आज रणजी करंडक स्पर्धेत बंगालकडून खेळण्यासाठी मैदानावर उतरला. त्याने मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात भेदक गोलंदाजी केली आणि १९ षटकांत ५४ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याने ४ निर्धाव षटकंही टाकली. त्याच्या या भेदक गोलंदाजीसमोर मध्य प्रदेशचा पहिला डाव १६७ धावांवर गडगडला आणि बांगालने ५४ धावांची आघाडी घेतली.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दुखापतीमुळे शमी मैदानापासून दूर होता. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत त्याचे खेळणे अपेक्षित होते,परंतु त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली आणि त्याला ही मालिका खेळता आली नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून त्याचे पुनरागमन शक्य नसल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले होते.
रोहितच्या विधानापूर्वी शमीने त्याचा सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण, त्याला खेळवण्याची घाई आम्हाला करायची नाही, असे रोहित व संघ व्यवस्थापनाचे म्हणणे होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघातून त्याचे नाव गायब राहिले. पण, त्याचा फॉर्म पाहून त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बोलावणे पाठवले जाऊ शकते. अशात जसप्रीत बुमराहला मोठी मदत मिळू शकते.
मोहम्मद शमीने ६४ कसोटी सामन्यांत २२९ विकेट्स घेतल्या आहेत. ११ जून २०२३ मध्ये तो शेवटची कसोटी ( वि. ऑस्ट्रेलिया) खेळला होता. त्यानंतर त्याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली होती. वन डे क्रिकेटमध्ये १०१ सामन्यांत त्याच्या नावावर १९५ विकेट्स, तर ट्वेंटी-२०त २३ सामन्यांत २४ विकेट्स आहेत.
जसप्रीत बुमराहला मिळेल साथ
रोहितच्या गैरहजेरीत पहिल्या कसोटीत जसप्रीत कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. आकाश दीप, मोहम्मद सिराज, हर्षित राणा ही युवा जलदगती गोलंदाजांची फौज संघात आहे. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांच्यासारखे अनुभवी फिरकीपटू संघात आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे सर्व जोमाने तयारीला लागले आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter