भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कालच्या सामन्यात नवा इतिहास रचला. बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात त्यांनी ५ बळी घेत आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या कामगिरीसह ICC स्पर्धांमध्ये पाच वेळा पाच विकेट्स मिळवणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
याशिवाय, कालच्या कामगिरीमुळे शमीने फक्त ५५ सामन्यांमध्ये २०० विकेट्स मिळवण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे.तो भारताकडून सर्वांत कमी सामन्यांत २०० बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडत हा मान पटकावला. यासोबतच त्याने भारताच्या माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांचा विक्रम मोडला असून, आता सर्वांत वेगाने २०० विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज आहे.
ही विक्रमी कामगिरी करताना त्याने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. त्यांच्या जोरदार पुनरागमनामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणाला नवसंजीवनी मिळाली आहे. एक अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते.
दुखापतीतून पुनरागमनाची प्रेरणादायी कहाणी
मोहम्मद शमीची कारकीर्द ही संघर्ष आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण आहे. २०२३ च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर टाचेला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला तब्बल १४ महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले.
ही दुखापत इतकी गंभीर होती की, शमीच्या करिअरवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या कालावधीत, त्याने शस्त्रक्रिया केल्या. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, "माझ्या मनात अनेक शंका होत्या. मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन का? दोन महिन्यांनंतर, जेव्हा मला जमिनीवर पाय ठेवण्यास सांगितले, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मात्र, मी कधीही हार मानली नाही."
या कालावधीत मानसिक आणि शारीरिक संघर्षाचा सामना करत त्याने कठोर परिश्रम सुरूच ठेवले. क्रिकेटच्या मैदानावर परतण्याचा दृढ निश्चय त्याने मनात पक्का केला आणि शेवटी आपल्या मेहनतीच्या जोरावर भव्य पुनरागमन केले.
मोहम्मद शमी याने कालच्या शानदार प्रदर्शनानंतर ICC ODI स्पर्धांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत झहीर खानला मागे टाकले आहे. शमीच्या नावावर आता ६० विकेट्स जमा झाल्या असून, त्यांनी झहीर खानच्या ५९ विकेट्सच्या विक्रमावर मात केली आहे. भारतीय गोलंदाजीतील दोन दिग्गजांच्या या आकडेवारीवर नजर टाकल्यास, झहीर खानने २००३ आणि २०११ च्या विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. मात्र, शमीने केवळ काहीच ICC स्पर्धांमध्ये खेळूनच हा विक्रम पार केला आहे. त्याच्या या यशामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.
बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात शमीने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स मिळवल्या. त्याने या विक्रमात श्रीलंकेचा मुथैया मुरलीधरन, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि पाकिस्तानचा वसीम अक्रम यांना मागे टाकले आहे.
शमीच्या या विक्रमी कामगिरीचे क्रिकेटविश्वात मोठे कौतुक होत आहे. भारतीय संघाच्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. विशेषतः अशा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्यांची गोलंदाजी संघासाठी फार मोलाची ठरते.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांच्यासह भारतीय वेगवान तिकडीमध्ये शमीचा समावेश आहे. हे तीनही गोलंदाज संघाचे आधारस्तंभ आहेत. त्यांची मोठ्या सामन्यांमध्ये त्यांची विकेट घेण्याची क्षमता ही भारतीय संघासाठी मोठी ताकद ठरते. मोहम्मद शमी हा युवा गोलंदाजांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा गोलंदाज शिकत आहेत.
शमीने आपल्या पुनरागमनाने भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा पर्याय निर्माण केला आहे. मात्र, आता संघ व्यवस्थापनाची जबाबदारी असेल की, शमीला योग्य वेळेत विश्रांती आणि योग्य ट्रेनिंग मिळावे. असे झाल्यास आगामी स्पर्धांमध्ये तो आणखी प्रभावी खेळाडू ठरेल.
या ऐतिहासिक कामगिरीनंतर, मोहम्मद शमीने आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवर याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आणि आपल्या संघासाठी भविष्यातही सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचे आश्वासन दिले. त्याने लिहले, “परत येणे सोपे नव्हते, पण मी नेहमीच कठोर परिश्रमांवर विश्वास ठेवतो. संघासाठी ही सर्वोत्तम गोलंदाजी देण्यासाठी मी सदैव तयार आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद!"
या पोस्टनंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या जिद्दीला सलाम केला आहे. मोहम्मद शमी यांची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी अभिमानास्पद ठरली आहे. त्यांच्या मेहनतीमुळे भारताच्या ICC स्पर्धांमधील विजयाच्या संधी निश्चितच वाढल्या आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter