कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मोईन अली.
सुनील नारायणला दुखापत झाल्यामुळे अखेरच्या क्षणी संघात घेतलेल्या मोईन अलीने आपल्या प्रभावी कामगिरीने कोलकाता संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. गुवाहाटीतील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर मोईन अलीने २३ धावांत २ विकेट घेतल्या, तर वरुण चक्रवर्तीनंही १७ धावांत २ विकेट मिळवल्या. यामुळे कोलकाता संघाने राजस्थानला ९ बाद १५१ धावांत रोखले आणि हे आव्हान १७.३ षटकांत पार करत यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवला.
या विजयावर प्रतिक्रिया देताना कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, "मोईन अलीला संधी मिळताच त्याने त्याचा पुरेपूर उपयोग केला. गोलंदाजांनी सातत्याने विकेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मोईनचा प्रभाव जास्त दिसून आला."
मोईनला विशेष जबाबदारी देण्यात आली होती का? यावर रहाणे म्हणाला, "त्याला कोणतीही वेगळी सूचना दिली नव्हती. आम्ही फक्त त्याला सांगितले की, तुला योग्य वाटेल तशी टप्पा आणि दिशा सांभाळून गोलंदाजी कर. मोईन अनुभवी आहे आणि त्याला खेळपट्टीनुसार गोलंदाजी कशी करायची हे माहीत आहे."
मोईन अलीला या सामन्यात सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले. मात्र तो फलंदाजीत अपयशी ठरला. तरीही त्याचे एकूण योगदान संघासाठी महत्त्वाचे ठरले.
"मोईन अलीकडे संघात अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची जास्त संधी नव्हती. कारण सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती हे संघाचे प्रमुख फिरकीपटू आहेत. पण मोईन सातत्याने सराव करत होता आणि त्याचाच फायदा त्याला संधी मिळताच झाला," असे रहाणे म्हणाला.
मोईन अलीनेही आपल्या कामगिरीबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मी नेहमीच सराव करतो आणि स्वतःला तयारीत ठेवतो. सामन्याच्या सकाळीच मला कळले की, सुनील नारायण दुखापतग्रस्त असल्याने मी संघात खेळणार आहे. त्यामुळे मी लगेच मानसिकदृष्ट्या सज्ज झालो."
राजस्थान रॉयल्सचा हंगामी कर्णधार रियान पराग सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत झाला. तो म्हणाला, "या खेळपट्टीवर १७० धावा आवश्यक होत्या, पण आम्हाला फक्त १५१ धावाच करता आल्या. २० धावा कमी पडल्या. कोलकाताचा सलामीवीर क्विंटन डिकॉकला लवकर बाद करण्याची आमची योजना होती, पण आम्हाला त्यात यश मिळाले नाही."
कोलकाताच्या या विजयात मोईन अलीने केलेली गोलंदाजी निर्णायक ठरली. संधी मिळताच त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. अजिंक्य रहाणेनेही त्याच्या योगदानाचे कौतुक केले. पुढील सामन्यात कोलकाता संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter