विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणासोबतच खेळ सुद्धा महत्वाचा आहे. नुकतेच काशी विश्व हिंद विद्यापीठ वाराणसी येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मंगळवेढा तालुक्यातील सद्गुरु सयाजी बागडे महाराज विद्यालयातील अमन पटेल आणि आशाबी पटेल या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे. यामध्ये अमनने दोन सुवर्ण तर आशाबीने दोन रौप्यपदकांना गवसणी घातली आहे. अमन हा १४ वर्षांचा तर आशाबी ही १५ वर्षांची आहे.
वाराणसी येथे झालेल्या कराटे स्पर्धेत मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर, बावची, शिरनांदगी या शाळेतील जवळपास १९ विद्याथ्यर्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातीलच काही विद्यार्थ्यांनी त्याठिकाणी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक विठ्ठल गारगुंडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. याव्यतिरिक्त कराटे स्पर्धेमध्ये पंजाब, हरियाना, दिल्ली, बिहार, राजस्थान, झारखंड, कलकत्ता, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या राज्यातील एकूण १६०४ मुला-मुलींनी सहभाग घेतला.
अमन आणि आशाबी यांच्याविषयी बोलताना त्यांचे चुलते अशपाक पटेल म्हणतात, “अलीकडे मुलींवर होणारे अत्याचार वाढत आहेत. मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे यासाठी विविध शाळा महाविद्यालय कराटे तसेच बॉक्सिंगचे क्लास घेतात. याच पद्धतीने आमच्या येथील सद्गुरु सयाजी बागडे महाराज विद्यालयाने कराटेचे प्रशिक्षण सुरू केले. हे विद्यालय आमच्यापासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे.”
पुढे ते म्हणतात, “महाविद्यालयातील कराटे क्लासेसला सुरुवातीला आशाबी ला जायला लागली. आशाबी चे पाहून अमन देखील कराटे क्लासला जाऊ लागला. यानंतर त्यांच्या शिक्षकांनी अमन आणि आशाबी ला बाहेर स्पर्धेसाठी नेले. त्या स्पर्धेमध्ये अमन आणि आशाबी यांनी चांगली कामगिरी केली. तसेच त्याठिकाणी ते जिंकले सुद्धा. त्यांना खेळात पदक मिळण्याची ती पहिलीच वेळ. त्यावेळी आम्हाला ते दोघे चांगले कराटे खेळतात असे लक्षात आले.”
अभ्यास आणि खेळात समतोल साधने आवश्यक
मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे असे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. त्यामुळे एरवी कुटुंबातील मंडळी मुलांना खेळू नको अभ्यास कर असे म्हणताना दिसतात. अमन आणि आशाबी अभ्यासातून कराटेसाठी कसा वेळ काढतात याविषयी सांगताना अशपाक पटेल म्हणतात, “अमन आणि आशाबी आता लहान आहेत. तरीही ते दोघे खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी एकदम व्यवस्थितपणे करतात. सकाळी सातला ते कराटे क्लासेससाठी जातात. कराटेचा सराव करून ते अकरा वाजता शाळेत जातात. त्यामुळे जास्त अडचणी येत नाहीत.”
पुढे ते म्हणतात, “सध्या लहान मुले मैदानी खेळ सोडून मोबाईल बघत बसतात. मोबाईलमध्ये गेम खेळतात. मैदानी खेळापासून ते दूर आहेत. अमन आणि आशाबी लहान असून त्यांची खेळाची आवड जपत आहेत. मैदानी खेळ खेळत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितकाच मुलांना खेळदेखील महत्त्वाचा आहे.”
अमन आणि आशाबी यांच्या अभ्यासाविषयी त्यांचे शिक्षक शरद कांबळे म्हणतात, “पालकांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची ओळख करून देणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. अमन आणि आशाबी खेळासोबत अभ्यासात हुशार आहे. खेळामुळे विद्यार्थी अभ्यासात कमी पडत असतील तर शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेतात. मुलांच्या अभ्यासाकडे कोणतेही दुर्लक्ष होणार नाही आणि खेळातही सातत्य राहील याची काळजी शिक्षक आणि पालक घेतात.”
आशाबी अशी वळली कराटेकडे
कोणतीही खेळाडू घडण्यासाठी त्याला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याची गरज असते. खेळाडूंसामोर कोणीतरी आदर्श असणे आवश्यक असते. आपणही आपल्या रोल मॉडेलसारखे व्हावे, त्यांच्यासारखे यश आपल्याला मिळावे असे प्रत्येक खेळाडूला वाटते. दोन रौप्यपदकांना गवसणी घालणारी आशाबी आवाज मराठीशी बोलताना म्हणते, “आमच्या शाळेने कराटे क्लासेस सुरू केला तेव्हापासून मी त्या क्लासेसला जात आहे. माझ्यासोबत माझा भाऊ देखील येतो. सुरुवातीला मी खेळायला आवडते, आनंद मिळतो म्हणून जायचे. गारगुंडे सर आमचा सराव करून घ्यायचे. नंतर कराटे स्पर्धेत पहिल्यांदा बक्षीस मिळाले आणि मग मी मन लावून खेळायला सुरुवात केली.”
शिक्षक आणि घरातून मिळणाऱ्या मदतीविषयी विचारले असता अमन म्हणतो, “आम्हाला गारगुंडे सर आणि घरातील सर्वजण मदत करतात. आमच्या खेळावर ते जास्त लक्ष देतात. आम्ही कोणत्याही स्पर्धेसाठी गेलो तर घरच्यांचा आणि सरांचा पाठिंबा असतो. आमच्या खेळासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ते आम्हाला देतात. त्यामुळे आम्ही पुढे आणखी पदके जिंकून आणणार आहे.”
अमन आणि आशाबी यांनी केलेल्या दैदीप्यमान कामगिरीमुळे केवळ पटेल कुटुंबच तर साऱ्या गावाला आनंद साजरा करत आहे. या दोघांना विजयी करण्यात मार्गदर्शक शिक्षक विठ्ठल गारगुंडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या यशाचे मुख्याध्यापक विद्याधर पाटील, मुसा पाटील, सुखदेव चव्हाण, तुषार मोरे, रहीम मुलाणी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.