आता भारतातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. देशांतर्गत स्पर्धेत प्रोत्साहन देताना बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत सोमवारी सोशल मीडियावर महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पुरुषांच्या स्पर्धेसोबतच महिला व ज्युनियर क्रिकेट स्पर्धांसाठीही पुढाकार घेण्यात आला आहे.
विजय हजारे तसेच सय्यद मुश्ताक अली या पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धांमधील लढतींसाठी सामनावीर व मालिकावीर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच, महिला व ज्युनियर क्रिकेट स्पर्धांमध्येही प्लेयर ऑफ दी मॅच व प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. क्रिकेटपटूंच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही जय शहा यांच्याकडून सांगण्यात आले.
रणजी विजेत्याला पाच कोटी
बीसीसीआयकडून मागील वर्षी रणजी विजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली होती. मागील वर्षी रणजी विजेत्या मुंबई संघाला पाच कोटींचे बक्षीस देण्यात आले होते. इराणी करंडक विजेत्या संघासाठीची बक्षिसाची रक्कमही ही दुप्पट करण्यात आली. त्यामुळे आता इराणी करंडक विजेत्या संघाला ५० लाख बक्षिसाच्या रूपात देण्यात येत आहेत. उपविजेत्या संघाला २५ लाख रुपये देण्यात येतात. विजय हजारे करंडक व दुलीप करंडक या दोन्ही स्पर्धांमधील विजेत्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये बक्षिसाच्या रूपात देण्यात येत आहेत. दोन्ही स्पर्धांमधील उपविजेत्या संघाला ५० लाख रुपये मिळतात.
श्रेयस, इशान प्रकरणानंतर
श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी स्थानिक स्पर्धांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोघांनाही बीसीसीआयच्या वार्षिक करार श्रेणीमधून वगळण्यात आले. याप्रसंगी बीसीसीआयकडून कठोर पाऊल उचलण्यात आले. स्थानिक स्पर्धांना प्राधान्य दिल्यानंतरच खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडे होतील, असा पुढाकार या वेळी घेण्यात आला. जय शहा यांनी आता स्थानिक स्पर्धांसाठी रोख रकमेची बक्षिसे जाहीर केली. यामुळे खेळाडूंचे स्थानिक क्रिकेटवरील प्रेम अबाधित राहील व देशांतर्गत क्रिकेटचे महत्त्वही टिकून राहील.