दुबईत काल चॅम्पियन ट्रॉफीचा पाचवा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात पाकिस्तानने २४० धावा करत भारताला २४१ धावांचे लक्ष दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर विजय मिळवला. विराट कोहलीने १११ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. यामध्ये ७ चौकार मारले तर अनेक विक्रम देखील नावावर केले.
१४,००० एकदिवसीय धावा
विराट कोहलीने १३व्या ओव्हरमध्ये एकेरी धाव घेत १४,००० एकदिवसीय धावांचा टप्पा पार केला. विराटने ही कामगिरी फक्त २८७ डावात केली. याआधी सचिन तेंडुलकरने ही कामगिरी ३५० डावांमध्ये केली आहे. सचीनचा हा विक्रम मोडीत काढत विराट ने सर्वात कमी डावात १४००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला. विराट हा सचिन आणि कुमार संगकारानंतर १४,००० धावांचा टप्पा पार करणारा तिसरा तर पहिला सक्रिय फलंदाज आहे.
आयसीसी स्पर्धेत अर्धशतकांचं ‘अर्धशतक’
विराटने या खेळीदरम्यान आयसीसी स्पर्धांमधील ५०वे अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय, त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे ७३ वे अर्धशतक होते.
विराटचे शतक
विराट कोहलीने या सामन्यात एकदिवसीय कारकीर्दीतील ५१ वे शतक केले. तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ८२ वे शतक ठरले. तसेच, विराट पाकिस्तानविरुद्ध आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप या तिन्ही स्पर्धांमध्ये शतक करणारा पहिला फलंदाज ठरला.
'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
विराट कोहलीला या खेळीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. विराटने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक ५ वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकला आहे.
भारताची सुरुवात
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी रोहित शर्माला पाचव्या षटकात बाद केले. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी डाव सावरत धावा केल्या. गिल ४६ धावावर बाद झाला. तर श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्यात ११४ धावांची भागीदारी झाली.
कुलदीप यादवची फिरकी
कुलदीप यादवने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने सलमान आगा, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांची विकेट्स घेतली. हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या.