पदार्पणाच्या सामन्यातच कामरान गुलामने रचला विक्रम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
Kamran Ghulam
Kamran Ghulam

 

पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगले उत्तर दिले आहे. पहिल्या कसोटीत डावाने पराभव पत्करावा लागल्यामुळे पाकिस्तानच्या संघावर चौफेर टीका झाली होती. संघातील सीनियर्स खेळाडूंचा फॉर्म हा चिंतेचा विषय निवड समितीने या खेळाडूंना संघाबाहेर करून सोडवला. त्यामुळेच काही नवीन चेहरे दुसऱ्या कसोटीत दिसले आणि तब्बल १२ वर्षांनंतर एका खेळाडूला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अब्दुल्ला शफिक ( ७) व कर्णधार शान मसूद ( ३) यांना जॅक लिचने स्वस्तात बाद केले. इंग्लंडने सुरुवातीच्या षटकात फिरकीपटूला आणून पाकिस्तानला आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लंडच्या संघातही मॅथ्यू पॉट्स व बेन स्टोक्स यांचे पुनरागमन झाले. १९ धावांत २ विकेट्स गमावल्यानंतर सईस आयूब व पदार्पणवीर कामरान घुलाम यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी करून पाकिस्तानचा डाव सावरला. पॉट्सने ही जोडी तोडली. आयूब १६० चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ७७ धावांवर स्टोक्सच्या हाती झेल देऊन परतला.

ब्रेडन कार्सने पाकिस्तानला चौथा धक्का देताना सौद शकिलची ( ४) विकेट घेतली. एका बाजूने कामरान खिंड लढवत राहिला. त्याने १९३ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारांसह १०२ धावांची खेळी केली. त्याला मोहम्मद रिझवान साथ देतोय आणि दोघांनी संघाला ७५ षटकांत ४ बाद २२३ धावांपर्यंत पोहोचवले आहे.