मुंबईवर जम्मू-काश्मीरचा ऐतिहासिक विजय

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
जम्मू-काश्मीर क्रिकेट संघ
जम्मू-काश्मीर क्रिकेट संघ

 

रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या सामन्यात जम्मू-काश्मीरने मोठा इतिहास घडवला आहे. जम्मू-काश्मीरने गतविजेत्या मुंबईचा पराभव केला आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. ११ वर्षानंतर पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरने मुंबईला त्यांच्याच घरी पराभूत केले आहे. याआधी २०१४ मध्ये वानखेडे स्टेडियमवर जम्मू काश्मीरने ४ विकेट्स राखून मुंबईला नमवले होते.

शार्दूल ठाकूरच्या ५१ धावांमुळे मुंबईला पहिल्या डावात १२० धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरने २०६ धावा करताना ८६ धावांची आघाडी घेतली. जम्मूकडून सलामीवीर शुभम खजुरियाने ५३ आणि आबीद मुश्ताकने ४४ धावा केल्या. मुंबईच्या मोहित अवस्थीने ५ विकेट्स घेत संघाला सामन्यात आणले.

दुसऱ्या डावात घरसगुंडी कायम राहिली. रोहित, यशस्वी, अजिंक्य, श्रेयस, शिवम हे पुन्हा अपयशी ठरले आणि मुंबईची अवस्था ७ बाद १०१ झाली होती. पुन्हा एकदा शार्दूल ठाकूर मैदानावर उभा राहिला आणि शतक झळकावले. त्याने १३५ चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने ११९ धावांची खेळी केली. त्याने आठव्या विकेटसाठी तनुष कोटियनसह ( ६२) १८४ धावा जोडल्या आणि संघाला २९० धावांपर्यंत पोहोचवले.जम्मूच्या नबीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. उमर नजीरने २, तर युधवीरने ३ विकेट्स टिपल्या.

विजयासाठी २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर शुभम खजुरीयाने ४५ धावांची खेळी केली. यावेर हसनने २४ आणि विवरंत शर्माने ३८ धावांचे योगदान दिले आहे. कर्णधार पारस डोग्रा १५ धावांवर शाम्स मुलानीच्या गोलंदाजीवर बाद झाला. ही त्याची चौथी विकेट ठरली. आबीद मुश्ताक व कन्हैया वाधवान यांनी जम्मूचा डाव सावरला आणि संघाला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

मुंबईच्या संघाकडून शार्दूल ठाकूर व तनुष कोटियन सोडल्यास अन्य फलंदाजांना अपयश आले. गोलंदाजीत पहिल्या डावात मोहित अवस्थीने प्रभावी मारा केला, तर दुसऱ्या डावात शाम्स मुलानीने ४ विकेट्स घेत विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला.
 
ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया 
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रणजी ट्रॉफी सामन्यात विजयी झाल्याबद्दल संघाचे अभिनंदन केले. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "जम्मू आणि काश्मीरने रणजी ट्रॉफी २०२४-२५च्या सहाव्या फेरीतील मुंबई संघावर थोडक्यात ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. परास डोग्रा यांच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीर संघाने चौथ्या इनिंगमध्ये २०५ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत गाठले. आपल्या मध्यमगती गोलंदाज - युध्वीर सिंग (७ विकेट्स), उमर नजीर मीर (६ विकेट्स) आणि औकिब नबी (६ विकेट्स) यांनी अविश्वसनीय कामगिरी केली, त्यांनी मुंबईच्या २० पैकी १९ विकेट्स घेतल्या. शुभम खजुरिया (४५ धावा) आणि विवरांत शर्मा (३८ धावा) यांचे योगदान देखील महत्त्वाचे होते, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरला विजय मिळवता आला. या अद्भुत विजयावर संघाचे मनापासून अभिनंदन आणि भविष्यातील यशासाठी शुभेच्छा!!"