जेम्स अँडरसनची क्रिकेटमधून निवृत्ती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
जेम्स अँडरसन
जेम्स अँडरसन

 

तब्बल 21 वर्षे क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या जेम्स अँडरसनने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. त्याला इंग्लंडने विजयी भेट दिली. त्याच्यासाठी क्रिकेटचा निरोप घेणं भावनिक ठरलं.

2003 साली पदार्पण केलेल्या अँडरसनने इंग्लंडकडून लॉर्ड्सवर वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरचा सामना खेळला. या सामन्यात इंग्लंडने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शुक्रवार, 12 जुलै) एक डाव आणि 114 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात 12 विकेट्स घेणारा पदार्पणवीर गस ऍटकिन्सन इंग्लंडसाठी विजयाचा हिरो ठरला. दरम्यान, अँडरसनने या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या, त्यामुळे त्याने कसोटीत 188 सामन्यांत 704 विकेट्ससह कारकि‍र्दीची अखेर केली.

अँडरसनला भावूक निरोप
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी अँडरसनला इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर सामना पहिल्याच सत्रात संपला, त्यानंतरही त्याला दोन्ही संघातील खेळाडूंनी भेटून शुभेच्छा दिल्या. अँडरसनही सामन्यानंतर भावूक झाला होता.

अँडरसन केवळ कसोटीतीलच दिग्गज नाही, तर त्याने वनडेतही 194 सामन्यांत 269 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 19 आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत.

सचिनचा खास मेसेज
भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनेही अँडरसनसाठी खास पोस्ट केली आहे.

जिमी! २२ वर्ष तू तुझ्या अविश्वसनीय स्पेलने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. वेग, अचूकता, स्विंग आणि फिटनेस यासह तुला गोलंदाजी करताना पाहणे खूप आनंददायी होते. तू तुझ्या खेळाने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहेस. तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या स्पेलसाठी शुभेच्छा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तू जे नवीन शूज घातले आहेस, त्यासाठी तुला चांगले आरोग्य आणि आनंदी आयुष्य लाभो हीच शुभेच्छा.

~ सचिन तेंडुलकर

इंग्लंडचा विजय
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 41.4 षटकात सर्वबाद 121 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून मिकली लुईसने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून पहिल्या डावात गस ऍटकिन्सनने 7 विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसन, ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 90 षटकात 371 धावा केल्या. झॅक क्रावली (76), ऑली पोप (57), जो रूट (68), हॅरी ब्रुक (50) आणि जॅमी स्मिथ (70) यांनी अर्धशतके केली. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्सने 4 विकेट्स घेतल्या, तर जेसन होल्डर आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अल्झारी जोसेफने 1 विकेट घेतली.

दरम्यान इंग्लंडने 250 धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर वेस्ट इंडीजचा दुसरा डाव 47 षटकात सर्वबाद 136 धावाच करता आल्या. वेस्ट इंडीजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. इंग्लंकडून दुसऱ्या डावातही ऍटकिन्सनने 5 विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसनने 3 विकेट्स घेतल्या, तर बेन स्टोक्सने 2 विकेट्स घेतल्या.