भारताचे ३६ वर्षीय जय शहा हे रविवारपासून आयसीसीच्या चेअरमनपदावर विराजमान झाले. सर्वांत लहान वयामध्ये आयसीसीच्या प्रमुखपदावर कार्यरत होणारे ते पहिले व्यक्ती ठरले. आता चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनाचा मुद्दा सोडविण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
आयसीसीच्या चेअरमनपदी आतापर्यंत १५ व्यक्ती कार्यरत राहिल्या आहेत. या सर्वांचेच वय ५५ पेक्षा अधिक होते. दक्षिण आफ्रिकेचे पर्सी सोन हे २००६ मध्ये आयसीसीच्या प्रमुखपदावर विराजमान झाले. तेव्हा सर्वांत कमी वयाचे चेअरमन म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला. जागतिक स्तरावर नेणार
जय शहा यांनी पहिल्याच दिवशी क्रिकेट या खेळाला जागतिक स्तरावर नेण्याचे ध्येय व्यक्त केले. ते म्हणाले, क्रिकेट या खेळाला जागतिक
स्तरावर नेण्याचा प्रयत्न करणार आहे. या खेळामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचाही प्रयत्न करणार आहे. २०२८ मधील लॉस एंजिलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश ही मोठी घटना आहे. त्यामुळे हा खेळ आता आणखीन देशांपर्यंत पोहोचेल.
आयसीसीच्या चेअरमनपदावर नियुक्त होणारे जय शहा हे पाचवे भारतीय ठरले आहेत. याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन व शशांक मनोहर या भारतीयांनी आयसीसीचे चेअरमनपद अनुभवले आहे.
पुढील सचिव कोण?
जय शहा हे बीसीसीआयचे सचिव होते, मात्र आता ते आयसीसीच्या चेअरमनपदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या सचिवपदाची जागा रिकामी झाली आहे. या जागेवर कोणाची निवड होईल हे अद्याप गुलदस्त्यात आहे, तसेच आयसीसीच्या मंडळात भारताचे प्रतिनिधित्व कोणती व्यक्ती करेल याचे उत्तरही अद्याप मिळालेले नाही.