चेन्नईचा नाराज माजी कर्णधार रविंद्र जडेजाने अखेर आपली किंमत दाखवून दिली. चेन्नईला २ चेंडूत १० धावांची गरज असताना मोहित शर्मासारख्या कसलेल्या गोलंदाजाला एक षटकार आणि एक चौकार मारत चेन्नईला त्यांचे पाचवे विजेतेपद जिंकून दिले.
पावसामुळे चेन्नईसमोर विजयासाठी १५ षटकात १७१ धावांचे आव्हान होते. चेन्नईने हे आव्हान १५ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. चेन्नईकडून सर्वच फलंदाजांनी योगदान दिले. कॉन्वेने ४७ धावांची दमदार खेळी केली. तर रविंद्र जडेजाने ६ चेंडूत १५ धावा ठोकत चेन्नईचा विजय साकार केला.
आयपीएल २०२३ च्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर २१५ धावांचे आव्हान ठेवले. गुजरातकडून साई सुदर्शनने ४७ चेंडूत ९६ धावांची धडाकेबाज खेळी केली. सुदर्शन सोबतच वृद्धीमान साहाने देखील ५४ धावांचे योगदान दिले. त्याने २०४.२६ च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. हार्दिकने १२ चेंडूत २१ तर गिलने २० चेंडूत ३९ धावा ठोकल्या. चेन्नईकडून पथिरानाने २ विकेट्स घेतल्या.
आता चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्याने चेंडू मोहित शर्माच्या हातात चेंडू दिला. स्ट्राईकवर दुबे होता. मोहित शर्माने पहिला चेंडू यॉर्कर टाकला त्यावर एकही धाव झाली नाही.
- सामना ५ चेंडूत १३ धावा असा आला होता. दुसऱ्या चेंडूवर मोहितने एक धाव दिली.
- आता चेन्नईला ४ चेंडूत १२ धावा असा आला. स्ट्राईकवर असलेल्या जडेजाने १ धाव केली.
- सामना ३ चेंडू ११ धावा असा आला. शिवम दुबेने १ धाव केली.
- आता चेन्नईला विजयासाठी २ चेंडूत १० धावांची गरज होती.
- जडेजाने मोहितला पाचव्या चेंडूवर षटकार मारत सामना १ चेंडूत ४ धावा असा आणला.
- शेवटच्या चेंडूवर जडेजाने चौकार मारत चेन्नईला पाचवे विजेतेपद जिंकून दिले.
धोनी आला रे...
रायडू बाद झाल्यानंतर चेन्नईला सामना जिंकण्यासाठी १४ चेंडूत २२ धावांची गरज होती. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी क्रिजवर आला. मात्र पहिल्याच चेंडूवर मोहितने धोनीला बाद केले. हा चेन्नईसाठी मोठा धक्का होता. मोहितने आपल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव दिले. आता सामना १२ चेंडूत २१ धावा असा आला.
१९ वे षटक टाकणाऱ्या मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर एक धाव दिली. पुढचा चेंडू निर्धाव टाकला मात्र तिसऱ्या चेंडूवर शिवम दुबेने २ धावा केल्या. आता सामना ९ चेंडूत १८ धावा असा आला होता. दुबेने दोन धावा घेत सामना ८ चेंडूत १६ धावा असा आणला. षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर शमीने तीन धावा दिल्या.
सामना आला अटीतटीवर
चेन्नईला आता १८ चेंडूत विजयासाठी ३८ धावांची गरज होती. आपला शेवटचा आयपीएल सामना खेळणाऱ्या अंबाती रायडूने मोहित शर्माच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. यामुळे सामना १६ चेंडूत २८ धावा असा आला. तिसऱ्या चेंडूवर रायडूने अजून एक षटकार मारत सामना १४ चेंडूत २२ धावा असा आणला. मात्र रायडू पुढेच्याच चेंडूवर झेलबाद झाला.
रहाणेची झुंज
अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी चेन्नईला १० षटकात ११२ धावांपर्यंत पोहचवले. त्यामुळे आता चेन्नईसमोर ३० चेंडूत ५९ धावा करण्याचे टार्गेट होते. मात्र मोहित शर्माने १३ चेंडूत २७ धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणाले बाद केले. मात्र पुढच्याच १२ व्या षटकात शिवम दुबेने राशिद खानला १५ धावा चोपल्या.
नूर अहमदने चेन्नईचे वाढवले टेन्शन
पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात केल्यानंतर नूर अहमदने चेन्नईच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्याने सातव्या षटकात २६ धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला अन् ४७ धावा करणाऱ्या डेवॉन कॉन्वेला बाद केले. यामुळे धावांची गती वाढू लागली. मात्र अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी चेन्नईला ८ षटकात ९४ धावांपर्यंत पोहचवले.
चेन्नईचा पॉवर प्लेमध्ये धमाका
पावसामुळे सामना १५ षटकांचा झाल्यानंतर चेन्नईसमोर १७१ धावांचे टार्गेट आले. चेन्नईचे सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाडने ४ षटकाच्या पॉवर प्लेमध्ये ५२ धावा ठोकत चांगली सुरूवात केली. मात्र पाचव्या षटकात नूर अहमदने फक्त ६ धावा देत चेन्नईवर दबाव वाढवला.
अखेर सामना होणार सुरू
अखेर पंचांनी मैदान ओलं असतानाही सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना १२.१० वाजता सुरू होणार असून सामन्याची षटके १५ करण्यात आली आहेत. चेन्नईला १५ षटकात १७१ धावांचे टार्गेट असणार आहे. ४ षटकांचा पॉवर प्ले, एक गोलंदाज तीनच षटके टाकू शकणार.
अजून वाट पहावी लागणार
अहमदाबादमध्ये पाऊस थांबला आहे मात्र मैदान ओलं असल्याने सामना थांबला आहे आता पुढेची चाचपणी ही ११.३० ला होणार असून षटके कमी करण्यासाठी अजून ४५ मिनिटांचा वेळ आहे.
पाऊस थांबला मात्र...
अहदमाबादमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. मात्र मोठ्या सरीमुळे मैदान ओलं झालं असून ग्राऊंड स्टाफ मैदान कोरडं करण्यासाठी जीवाचं रान करत आहेत.
सामन्यात पावसाचा व्यत्यय
चेन्नई गुजरातचे २१५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. मात्र पहिल्या तीन षटकांचा खेळ होतो न होतो तोच पावसाने पुन्हा आपला खेळ सुरू केला. त्यामुळे सामना पुन्हा थांबवावा लागला.
सामन्यात पावसाचा व्यत्यय
गुजरातची फलंदाजी झाल्यानंतर लगेचच पावसाला सुरूवात झाली. मात्र पाऊस थोड्यावेळात थांबला आणि खेळ सुरू झाला.
साई सुदर्शनचे शतक हुकले
शेवटच्या षटकात साई सुदर्शनने सलग दोन षटकार मारत शतकाजवळ पोहचला. मात्र पथिरानाने त्याला ९६ धावांवर पायचित बाद केले. त्याचे अवघ्या ४ धावांनी शतक हुकले. अखेर गुजरातने २० षटकात ४ बाद २१४ धावा केल्या.
साई सुदर्शनचेही धडाकेबाज अर्धशतक
वृद्धीमान साहा बाद झाल्यानंतर साई सुदर्शनने तडाखेबाज फलंदाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना बेजार केले. त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. त्याने १७ वे षटक टाकणाऱ्या तुषार देशपांडेच्या षटकात तीन चौकार आणि एक षटकार मारत २० धावा वसूल केल्या.
वृद्धीमान बाद
वृद्धीमान साहाने ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत साई सुदर्शनला साथीला घेत दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. अखेर ही भागीदारी दीपक चाहरने फोडली. त्याने अर्धशथकवीर साहा बाद केले.
साहाचे अर्धशतक
गिल बाद झाल्यानंतर वृद्धीमान साहाने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत गुजरातला १२ व्या षटकात शतकी मजल मारून दिली. त्याने अर्धशतकी मजल मारली. त्याला साई सुदर्शनने देखील चांगली साथ देत होता.
६७-१ : अखेर रविंद्र जडेजाने दिला दिलासा
पॉवर प्लेमध्ये जीवनदान मिळाल्यानंतर गिलने धडाकेबाज फलंदाजी करण्यास सुरूवात केली होती. त्याने पॉवर प्लेमध्ये १७ चेंडूत ३६ धावा ठोकत संघाला ६२ धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र, रविंद्र जडेजाने पॉवर प्ले झाल्यानंतर शुभमन गिलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात पकडले. त्याने गिलला ३९ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.
संथ सुरूवातीनंतर गुजरातने वेग वाढवला
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईने पहिल्या दोन षटकात गुजरातच्या सलामीवीरांना मोठे फटके मारण्यापासून रोखले होते. मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकात वृद्धीमान साहाने १६ धावा चोपत आपली धावगती वाढवली. त्यात शुभमन गिलला चाहरने जीवनदान दिले. यानंतर वृद्धीमान आणि गिलने पॉवर प्लेमध्ये ६२ धावा केल्या.
चेन्नई विरूद्ध गुजरात अखेर नाणेफेक झाली.
आयपीएलच्या १६ व्या हंगामाच्या फायनलची नाणेफेक अखेर झाली. नाणेफेक धोनीने जिंकली असून प्रथम गोलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.