बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी न मिळालेल्या सर्फराझ खानने ही कसर इराणी करंडक सामन्यात शेष भारत संघाविरुद्धच्या लढतीत पूरेपूर भरून काढली. शानदार आणि दिमाखदार नाबाद द्विशतक केले त्यामुळे मुंबईने दोन दिवसांच्या खेळात ९ बाद ५३६ धावांचा डोंगर उभा केला.
अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी केवल ६८ षटकांचा खेळ झाला तर आज मुंबईच्या डावातील १३८ षटके पूर्ण झाली. या दोन दिवसांत मुंबईकरांना फलंदाजी केली आणि शेष भारत संघाच्या खेळाडूंच्या क्षमतेचा कस पाहिला.
या स्टेडियमपासून काही अंतररावर असलेल्या कानपूरमध्ये भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटीत सर्फराझ खान राखीव खेळाडू होता.
चौथ्या दिवसापर्यंत तो संघासोबत होता पण या इराणी सामन्यासाठी तो लखनौमध्ये आला आणि येथे त्याने देशांतर्गत स्पर्धांमधील आपले सातत्य दाखवून दिले. २७६ चेंडूंचा सामना करताना त्याने २५ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद २२१ धावांची खेळी केली.
एकीकडे सर्फराझ नाबाद द्विशतक करत असताना कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक मात्र तीन धावांनी हुकले. काल खेळ सुरु झाला तेव्हा मुंबईची अवस्था ३ बाद ३७ अशी झाली होती आणि आज हाच धावफलक ९ बाद ५३६ असा भरभक्कम झाला आहे.
पहिल्या दिवसाच्या ४० व्या षटकाच्या सुरुवातीस सर्फराझ मैदानावर आला आणि आज १३८ षटकांच्या खेळापर्यंत तो नाबाद राहिला ९८ षटके तो मैदानावर उपस्थित होता.
तीन मोठ्या भागीदारी
सर्फराझ खानने प्रथम अजिंक्य रहाणेसह पाचव्या विकेटसाठी १३१. सातव्या विकेटसाठी तनुष कोटियनसह १८३ आणि शार्दुल ठाकूहसह नवव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली.
आज सकाळी खेळ सुरु झाल्यावर सर्फराझ आणि रहाणे शेष भारत संघाच्या गोलंदाजांवर भारी ठरत होते. दोघेही सहजपणे धावा जमवत होते. धावांची सरासरी षटकामागे तीन पेक्षा अधिक धावांची होती. रहाणे अगोदर शतकाच्या जवळ गेला. पण तो ९७ धावांवर बाद झाला.
दुसरा नवा चेंडू उपलब्ध व्हायच्या अगोदर यश दयालने रहाणेवर आखूड टप्याचा चेंडू टाकला प्रथम या चेंडूवर रहाणेचे लक्ष होते तो सोडून द्यावा की खेळावा या द्विधामनस्थितीत असताना चेंडू हलकेच ग्लोजला लागून यष्टीरक्षकाकडे गेला आणि रहाणे शतकापासून वंचित राहिला.
रहाणेपाठोपाठ शम्स मुलानी बाद झाल्यावर शेष भारत संघाच्या गोलंदाजांना हायसे वाटले होते, परंतु त्यानंतर मुंबईच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी सादर झाली. ६४ धावा करणाऱ्या तनुष कोटियनने सर्फराझसह मुंबईची धावसंख्या साडेचारशेच्या पलिकडे नेली. अखेर प्रसिद्ध कृष्णाने सलग दोन चेंडूंवर तनुष आणि मोहित अवस्थी यांना बाद केले.
मुंबईच्या ८ बाद ४६८ धावा झालेल्या असताना सर्फराझच्या साथीला शार्दुल ठाकूर आला आणि या दोघांनीही शेष भारत संघाच्या गोलंदाजांना घाम गाळायला लावला. दिवसाचा खेळ संपायला तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असताना शार्दुल बाद झाला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई, पहिला डाव : १३८ षटकांत ९ बाद ५३६ (अजिंक्य रहाणे ९७, श्रेयस अय्यर ५७, सर्फराझ खान खेळत आहे २२१ - २७६ चेंडू, २५ चौकार, ४ षटकार, तनुष कोटियन ६४, शार्दुल ठाकूर ३६, मुकेश कुमार २८-२-१०९-४, यश दयाल २५-१-८९-२, प्रसिद्ध कृष्णा २६-४-१०२-२)