आयपीएलच्या १८ व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन स्टेडियमवर आज संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. क्रिकेटप्रेमी पुन्हा एकदा आयपीएलचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आतापर्यंत कोलकाता आणि बंगळुरू या दोन संघांनी एकूण ३४ सामने खेळले आहेत. त्यापैकी कोलकाताने २० विजय मिळवले असून बंगळुरूने १४ सामने जिंकले आहेत. आयपीएलशिवाय दोन्ही संघांमध्ये चॅम्पियन्स लीगमध्येही एक सामना झाला होता. हा सामना कोलकाताने जिंकला होता. गेल्या १० सामन्यांकडे पाहिले असता. दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात दोन्ही संघ नवीन नेतृत्वाखाली खेळणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सची कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे दिली गेली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे.
संघ रचना आणि खेळाडू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) : संघाने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना कायम ठेवले आहे. तसेच लियाम लिविंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, देवदत्त पडिक्कल आणि लुंगी एनगिडी यांसारखे नवीन खेळाडू संघात सामील झाले आहेत.
तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने सुनील नरेन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती यांना कायम ठेवले आहे. याशिवाय क्विंटन डिकॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्किया, रोवमैन पॉवेल, मनीष पांडे आणि मोईन अली हे खेळाडू नव्याने संघात दाखल झाले आहेत.
परंतु या सामन्यापूर्वी हवामान खात्याने कोलकातामध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे या सामन्यावर पावसाचे सावट आहे.पाऊस पडला, तर सामना रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र पाऊस झाला नाही तर क्रिकेटप्रेमींसाठी आजचा सामना उत्सुकता वाढवणारा असणार आहे. कोलकाता संघाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता त्यांचे पारडे जड वाटत आहे. मात्र बंगळुरू संघ नव्या नेतृत्वाखाली कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter