स्मृती मानधना (४७ धावा) व शेफाली वर्मा (५१ धावा) यांची दमदार फलंदाजी व राधा यादव, श्रेयांका पाटील, पूजा वस्त्रकार, रेणूका सिंग यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० लढतीत यजमान बांगलादेश संघावर सात विकेट व नऊ चेंडू राखून विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. शेफाली वर्मा हिची सामन्याची मानकरी म्हणून निवड करण्यात आली.
बांगलादेशकडून भारतीय महिला संघासमोर ११८ धावांचे आव्हान उभे ठाकले. स्मृती मानधना व शेफाली वर्मा या सलामी जोडीने ९१ धावांची भागीदारी करताना भारताच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली. दोघांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. शेफालीने ३८ चेंडूंमध्ये आठ चौकारांसह ५१ धावांची खेळी साकारली. रितू मोनीच्या गोलंदाजीवर ती बाद झाली. त्यानंतर मानधना हिला आपले अर्धशतक झळकावता आले नाही. नाहिदा अख्तेर हिने तिला ४७ धावांवर बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद सहा धावा) व रिचा घोष (नाबाद आठ धावा) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
गोलंदाजांनी रोखले
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. दिलारा अख्तेरने ३९ धावांची व निगार सुल्तानाने २८ धावांची खेळी केली; पण कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. राधा यादव हिने २२ धावा देत दोन फलंदाज बाद केले. श्रेयांका पाटील, रेणूका सिंग व पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. बांगलादेशला आठ बाद ११७ धावांपर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश - २० षटकांत ८ बाद ११७ धावा (दिलारा अख्तेर ३९, निगार सुल्ताना २८, राधा यादव २/२२, श्रेयांका पाटील १/२४) पराभूत वि. भारत १८.३ षटकांत तीन बाद १२१ धावा (स्मृती मानधना ४७, शेफाली वर्मा ५१, रितू मोनी १/१०).