भारतीय महिला आणि पुरुष रिले संघ 4x400 मीटर रिलेमध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहेत. बहामास येथे सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स रिलेमध्ये सोमवारी भारतीय महिला संघाने दुसऱ्या फेरीतील हीटमध्ये दुसरे स्थान पटकावले. तर पुरुष संघानेही दुसऱ्या हीटमध्ये दुसरे स्थान मिळवून पात्रता मिळवली.
रुपल चौधरी, एम आर पूवम्मा, ज्योतिका श्री दांडी आणि सुभा वेंकटेशन यांनी तीन मिनिटे आणि 29.35 सेकंदात जमैका (3:28.54) च्या मागे हीट नंबर वनमध्ये दुसरे स्थान पटकावले. तत्पूर्वी, भारतीय संघाने रविवारी पहिल्या फेरीच्या पात्रता फेरीत तीन मिनिटे आणि 29.74 सेकंद वेळेसह पाचवे स्थान पटकावले होते.
पुरुष संघाने पटकावला दुसरा क्रमांक
मोहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांच्या पुरुष संघाने 3:3.23 सेकंदांची वेळ नोंदवत अमेरिकेच्या (2:59.95) मागे दुसरे स्थान पटकावले. दुसऱ्या फेरीतील तीन हीटमधील अव्वल दोन संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील अशी माहिती आहे. पॅरिस ऑलिम्पिक यावर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडे 19 ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट आहेत, ज्यात टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा देखील आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील ॲथलेटिक्स स्पर्धा 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.