भारतीय संघाला सरफराजच्या शतकी खेळीने सावरले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 6 d ago
सरफराज खान
सरफराज खान

 

बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेलीत पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ अडचणीत सापडला होता; परंतु दुसऱ्या डावात भारताने पुनरागमन केले आहे. भारताला पुनरागमन करून देण्यात सर्फराज खानने शतक झळकावत मोठा वाटा उचलला.

या सामन्यात पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला, मात्र भारतीय संघ फक्त ४६ धावांवरच सर्वबाद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा ठोकत ३५६ धावांची आघाडी घेतली. परंतु, तिसऱ्या दिवशी भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रोहित शर्मा अर्धशतक करून बाद झाल्यानंतर विराट कोहलीबरोबर फलंदाजी करत सर्फराजने भारताचा डाव पुढे नेला. त्याने विराटबरोबर चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचली.

पण विराट तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विराट ७० धावांवर बाद झाला. यावेळी सर्फराजही ७० धावांवर नाबाद होता. त्याने चौथ्या दिवशी ऋषभ पंतबरोबर फलंदाजीला येत चांगली सुरुवातही केली. त्यानंतर त्याने चौथ्या दिवशी ११० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह त्याचे शतक झळकावले. सर्फराजचे हे पहिले कसोटी शतक आहे. विशेष म्हणजे या सामन्यात पहिल्या डावात तो शुन्यावर बाद झाला होता.

सर्फराजचा दिग्गजांमध्ये समावेश
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात पहिल्या डावात शुन्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतक ठोकणारा सर्फराज शिखर धवननंतरचा दुसराच भारतीय आहे. यापूर्वी शिखर धवनने २०१४ मध्ये ऑकलंडला पहिल्या डावात शुन्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात ११५ धावा केल्या होत्या.

तसेच २१ व्या शतकात कसोटीमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी शतक करणारा सर्फराज सातवाच फलंदाज आहे. २१ व्या शतकात चौथ्या क्रमांकावर आत्तापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि अजिंक्य रहाणे यांनी शतके केली आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter