भारतीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलर अन्वर अलीवर चार महिन्यांची बंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 6 d ago
अन्वर अली
अन्वर अली

 

भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अन्वर अली याच्यावर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चार महिन्यांची बंदी घातली आहे. मोहन बगानसह असलेला करार अवैधपणे रद्द केल्यामुळे अन्वर अलीवर ही कारवाई करण्यात आली.

बंदीसह त्याच्यावर १२.९० कोटी रुपयांची भरपाई मोहन बगानला देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

मोहन बगानशी असलेला करार रद्द करून अन्वर अलीने दिल्ली एफसी आणि ईस्ट बंगाल यांच्याशी करार केला होता. या क्लबवरही फुटबॉल महासंघाच्या खेळाडू स्टेटस समितीने कारवाई केली.

हे दोन्ही क्लब २०२४-२५ आणि २०२५-२६ या मोसमातील खेळाडू अदलाबदलीच्या विंडोजमध्ये (ट्रान्सफर) कोणत्याही खेळाडूंनी नोंदणी करू शकत नाहीत.

अन्वर अली, ईस्ट बंगाल आणि दिल्ली एफसी यांनी मूळ करारातील उर्वरित रक्कम संयुक्तपणे ८.४० कोटी आणि संघाचे नुकसान झाल्याबद्दल अतिरिक्त २.५० कोटी भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ कोटी रुपये अगोदर देण्यात आलेले आहेत.

दरम्यान आता AIFF संविधानातील कलम ५१ नुसार २४ वर्षीय अन्वर अली त्याच्यावर झालेल्या कारवाईविरुद्ध AIFF अपील कमिटीकडे दाद मागू शकतो.

त्याला दाद मागायची असेल तर त्याच्यावर झालेल्या कारवाईच्या नोटीसनंतर तीन दिवसात त्याला अपील करावे लागणार आहे. जर त्याची याचिका अपील कमिटीने फेटाळली, तर को क्रीडा लवादाकडेही याबाबत दाद मागू शकतो.

तथापि, सध्या झालेल्या निलंबनामुळे आता अन्वरला आता हे प्रकरण संपेपर्यंत भारतासाठीही खेळता येणार नाही. तसेच तो आता चार महिन्यांनंतर खेळू शकतो.

यापूर्वी २०१९ मध्ये पुणे सिटी एफसी आणि स्पॅनिश फुटबॉलर नेस्टोर गोर्डियालो यांच्यावरही अशा प्रकारची कारवाई झाली होती, त्यांच्यावर अनुक्रमे पाच लाख दंडासह दोन विंडो ट्रान्सफर बंदी आणि चार महिन्यांसाठी निलंबन अशी कारवाई झाली होती.