भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडत सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. रविवारी मलेशियातील बायुएमास ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या भेदक माऱ्यासमोर टिकाव धरू शकला नाही आणि अवघ्या ८२ धावांवर गारद झाला. भारतीय गोलंदाजांनी मारा करत संपूर्ण नियंत्रण राखले आणि आफ्रिकेच्या फलंदाजांना धावफलक हलवण्याची संधीच दिली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाच्या विजयावर दिल्या शुभेच्छा
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून अभिनंदनपर संदेश दिला. ते म्हणाले "आपल्या नारीशक्तीचा मला अभिमान आहे! भारतीय संघाने आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक २०२५ जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा विजय संघाच्या उत्कृष्ट टीमवर्क, जिद्द आणि कठोर परिश्रमांचा परिणाम आहे. हा विजय अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल. संघाला भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!" असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विजयाची दैदिप्यमान कामगिरी
भारतीय संघाने दिलेल्या प्रत्युत्तरात सहजतेने लक्ष्याचा पाठलाग केला. भारताच्या सलामीवीरांनी जलद सुरुवात करत दोन षटकांतच १८ धावा फलकावर लावल्या. जरी जी. कमालिनला पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात गमवावे लागले, तरी गोंगडी तृषा आणि सानिका चालके यांनी संयमाने फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
गोंगडी तृषाने ४४ धावांची नाबाद खेळी केली, तर सानिका चालके २६ धावांवर नाबाद राहिली. भारतीय संघाने ८.२ षटके राखून सहज विजय मिळवत विश्वचषकावर पुन्हा आपली मोहोर उमटवली.
गोंगडी तृषाने आपल्या अप्रतिम अष्टपैलू कामगिरीने संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळ केला. तिने ३०९ धावा केल्या आणि सात बळी घेतले. यामुळे तिला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारतीय खेळाडूंच्या विजयी जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या निराशेचे चित्र स्पष्ट दिसत होते. मात्र, भारताच्या युवा महिला संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली सत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.