नवी दिल्ली :भारताच्या क्रीडा इतिहासात अभिमानास्पद क्षण आला आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी २०२५ खो-खो वर्ल्ड कप जिंकत नवा इतिहास रचला आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या या ऐतिहासिक स्पर्धेत भारतीय संघांनी नेपाळवर दमदार विजय मिळवत पहिलावहिला खो-खो वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.
महिला संघाने नेपाळचा ७८-४० ने धुव्वा उडवला!
भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा एकतर्फी पराभव करत ३८ पॉइंट्सच्या फरकाने विजय मिळवला. १९ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ७८-४० अशा मोठ्या फरकाने नेपाळला पराभूत केले.
भारतीय महिला संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासूनच वर्चस्व गाजवले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर 176 पॉइंट्सच्या फरकाने मोठा विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी प्रत्येक सामन्यात शानदार प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्याचा आढावा :
- पहिल्या टर्नमध्ये भारताने अटॅक करत ३४-० अशी निर्विवाद आघाडी घेतली.
- दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळने संघर्ष केला, पण भारताने त्यांना ३५-२४ पर्यंत मर्यादित ठेवले.
- तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आणखी आक्रमक खेळ करत ७३-२४ अशी निर्णायक आघाडी घेतली.
- चौथ्या टर्नमध्येही भारताने उत्कृष्ट बचाव करत सामना ७८-४० अशा फरकाने जिंकला आणि पहिला महिला खो-खो वर्ल्ड कप जिंकला!
पुरुष संघानेही ऐतिहासिक विजय मिळवला!
भारतीय पुरुष संघानेही अंतिम सामन्यात नेपाळचा ५४-३६ ने पराभव करत विजेतेपद पटकावले.
पुरुष संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा विक्रम केला. त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतानवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
अंतिम सामन्याचा आढावा :
- नेपाळने टॉस जिंकून डिफेन्स करण्याचा निर्णय घेतला.मात्र, भारतीय संघाने पहिल्याच टर्नमध्ये २६ पॉइंट्स मिळवत दमदार सुरुवात केली.
- नेपाळने दुसऱ्या टर्नमध्ये १८ पॉइंट्स मिळवले, पण भारताने ८ पॉइंट्सची आघाडी कायम ठेवली.
- तिसऱ्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमक खेळ करत ५४ पॉइंट्सचा टप्पा पार केला.
- चौथ्या टर्नमध्ये नेपाळला फक्त ८ पॉइंट्स मिळाले आणि भारताने ५४-३६ ने शानदार विजय मिळवला.
भारतीय संघांचे संपूर्ण देशभरातून कौतुक!
भारताच्या दोन्ही संघांच्या या ऐतिहासिक विजयावर संपूर्ण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडा प्रेमींसह विविध नेत्यांनी ट्विटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघांचे कौतुक केले आहे.
“भारतीय महिला आणि पुरुष संघांनी एकाच स्पर्धेत वर्ल्ड कप जिंकत नवा इतिहास रचला आहे. हा विजय भारतीय क्रीडा संस्कृतीसाठी गौरवशाली आहे!” - असे खो-खो महासंघाने ट्वीटद्वारे सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही, "उत्सव इथेच थांबत नाही!नेपाळवर नेत्रदीपक विजय मिळवून उद्घाटनाच्या खो खो विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय पुरुष खो खो संघाचे अभिनंदन!" असे ट्विट करत भारतीय संघाचा कर्णधार प्रतीक वायकर,आदित्य गणपुले, रामजी कश्यप, अनिकेत पोटे आणि सुयश गरगटे - त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले आहे. हा विजय महाराष्ट्राचा समृद्ध वारसा साजरा करतो आणि पुढच्या पिढीला पारंपारिक खेळांकडे वळण्यासाठी प्रोत्साहित ही करत आहे.असेही फडणवीस म्हणले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी " प्रथमच खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन! हा ऐतिहासिक विजय त्यांच्या अतुलनीय कौशल्य, जिद्द आणि सांघिक कार्याचा परिणाम आहे.या विजयाने भारतातील सर्वात जुन्या पारंपारिक खेळांपैकी एकावर अधिक प्रकाश टाकला आहे, ज्याने देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. या यशामुळे पुढील काळात आणखी तरुणांना या खेळाचा पाठपुरावा करण्याचा मार्ग मोकळा होवो." असे ट्विट करत महिला खो-खो संघाला शुभेच्छा दिल्या. तर "आजचा दिवस भारतीय खो खो साठी खूप छान आहे.खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष खो खो संघाला कमालीचा अभिमान वाटतो. त्यांची जिद्द आणि समर्पण वाखाणण्याजोगे आहे. या विजयामुळे युवकांमध्ये खो खो अधिक लोकप्रिय होण्यास हातभार लागणार आहे." असे ट्विट करत पुरुष खो-खो संघाचे अभिनंदन केले आहे.
भारताचा खो-खो विश्वविजेता प्रवास :
- महिला संघाने ७८ -४० ने नेपाळचा पराभव केला
- पुरुष संघाने ५४-३६ ने नेपाळला हरवले
- महिला संघाचा पहिल्या सामन्यात १७६ पॉइंट्सचा विक्रमी विजय
- पुरुष संघाची अपराजित मोहीम, नॉकआउटमध्ये एकतर्फी विजय