भारतीय क्रिकेट संघाने रविवारी पार पडलेल्या अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत न्यूझीलंड संघावर ४४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने चॅम्पियन्स करंडकाच्या साखळी फेरीत तीन लहतीमध्ये विजयासह वर्चस्व राखले. आता भारतीय संघासमोर ४ मार्च रोजी होत असलेल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.
न्यूझीलंडला पाच मार्च रोजी होत असलेल्या उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागेल. २४९ धावांची पाठराखण न्यूझीलंडच्या गुणवान फलंदाजीसमोर करणे आव्हानात्मक काम होते. रोहित शमनि संघात चार फिरकी आणि दोनच वेगवान गोलंदाज ठेवले होते. हार्दिक पंड्याने जबाबदारी स्वीकारत राचिन रवींद्रची महत्त्वाची विकेट काढली. विल यंगला वरुण चक्रवर्तनि बाद केले आणि भारतीय खेळाडूंच्या पायात वीज दिसू लागली. फिरकी गोलंदाजांनी एकदम अचूक मारा केला आणि चांगले क्षेत्ररक्षण केल्याने एकेरी धावा रोखल्या गेल्या. एकटा केन विल्यमसन (८१ धावा) त्याचा दर्जा सिद्ध करत गोलंदाजांना आरामात खेळत होता.
त्याआधी नाणेफेक जिंकणारा कप्तान पहिली गोलंदाजी घेणार हे उघड होते. मिचेल सँटनरने तेच केले. भारतीय संघात एका वेगवान गोलंदाजाला बसवून वरुण चक्रवर्तीला संधी दिली गेली. पहिल्या दोन सामन्यात उत्तम फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलला पायचीत करून मॅट हेनरीने मस्त सुरुवात करून दिली. रोहित आणि विराटची डाळ जास्त शिजली नाही. विराटचा ग्लेन फिलीप्सने पकडलेला झेल केवळ अफलातून होता. विराटने जोरदार स्केअर कटचा फटका फिलीप्सने उजवीकडे सूर मारत एका हातात पकडला तेव्हा विराटचाही विश्वास बसला नाही. ३ बाद ३० धावसंख्येवरून श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने हालणारी नौका स्थिर केली. श्रेयस अय्यरने संधी मिळाल्यावर खराब चेंडूंवर मोठे फटके मारले.
चारही संघ दुबईमध्ये
भारत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड चार संघ उपांत्य फेरीत दाखल अगोदरच झाले होते. कळत नव्हते की कोण कोणाशी आणि कुठे सामना खेळणार. आयसीसीने मग डोके लढवून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना दुबईला विमानाने पाचारण केले. म्हणजेच भारत वि न्यूझीलंड सामना सुरू असताना चारही उपांत्य फेरी गाठलेले संघ दुबईत होते. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. रविवारच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवल्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दुबईत, तर दुसरा न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना लाहोरला होणार आहे.
अय्यर - अक्षर जोडीची ९८ धावांची भागीदारी
अर्धशतकी मजल पार करायला श्रेयसला ७४ चेंडू लागले. त्याची ९८ धावांची रंगलेली भागीदारी अक्षर पटेल ४२ धावांवर बाद झाल्याने तुटली. पाठोपाठ जबरदस्त फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर ७८ धावांवर बाद झाला. के. एल. राहुलसुद्धा अर्धवट २३ धावा करून तंबूत परतला. भारतीय संघाचा धावफलक २५०चा टप्पा कसा पार करेल, अशी शंका यायला लागली होती. त्या वेळी हार्दिक पंड्याने योग्य खेळी केली. ४ चौकार २ षटकार मारून हार्दिकने ४५ धावा पटापट केल्या, म्हणून ५० षटकांच्या अखेरीला भारताला बरोबर ९ बाद २४९ धावा करता आल्या. मॅट हेनरीने तुफानी मारा करताना पाच फलंदाज बाद केले.