पाकिस्तानला चॅम्पियन ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद मिळाले खरे, परंतु टीम इंडिया त्यासाठी तिथे जाणार नाही हे निश्चित आहे. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध पाहता, भारताने शेजाऱ्यांसोबत क्रिकेट मालिका खेळणं बंद केले आहे. BCCI ने या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवयाचे की नाही, हा निर्णय केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) अजूनही संभ्रमात आहेत.. कारण २०२३ मध्ये भारताच्या नकारामुळे आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद असूनही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाबतीतही तेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय संघाचा नकार पाहता ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानुसार भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवण्यात येण्याचे वृत्त समोर येत आहे. त्यात जर भारतीय संघ फायनलमध्ये गेल्यास तो सामना दुबईला खेळवला जाईल. टीम इंडिया फायनलमध्ये न गेल्यास लाहोरमध्येच फायनल होईल. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे आणि सर्व १५ सामने पाकिस्तानमध्ये आयोजित केले जातील असे PCB सांगतेय.
२००८ पासून भारताने पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. भारत सरकार पाकिस्तान दौऱ्यावरील बंदी शिथिल करेल असे अद्याप कोणतेही संकेत नाहीत. त्यामुळे आयसीसीला शेवटी भारताच्या सामन्यांसाठी वेगळे स्थळ शोधावे लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाठवलेल्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार ९ मार्च रोजी लाहोरमध्ये फायनल होणार आहे. टेलिग्राफ स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास पर्याय म्हणून दुबई ची निवड होऊ शकते. भारताचे साखळी फेरीतील सामने आणि सेमीफायनल व फायनलची मॅच देखील दुबईत खेळवली जाऊ शकते. दुबई, अबुधाबी आणि शारजाह या ठिकाणांचा विचार सुरू आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारत पाकिस्तानमध्ये येईल अशी आशा व्यक्त केली होती. आम्हाला विश्वास आहे की, भारतीय संघ इथे येईल. आम्ही पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्व सामन्यांचे यशस्वी आयोजन करू, असे नक्वी म्हणाले. १९९६ नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यजमान पाकिस्तान गतविजेते म्हणून या स्पर्धेत खेळतील.