हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला हैदराबादच्या उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या नॉर्थ पॅव्हेलियन स्टँडवरून मोहम्मद अझरुद्दीनचे नाव हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाला माजी सरन्यायाधीश व्ही. ईश्वर यांनी मान्यता दिली आहे. तसेच मोहम्मद अझरुद्दीनच्या नावाने छापलेले कोणतेही तिकीट विकले जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडवरून नाव हटवल्याबद्दल मोहम्मद अझरुद्दीन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेला त्यांनी मन दुखावणारी आणि 'खेळाचा अवमान करणारी घटना म्हटले आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, "हे बोलताना मला खूप दुख होते, पण कधी कधी वाटते की क्रिकेट खेळलेच नसते तर बरे झाले असते. आजकाल असे लोक खेळाचे नेतृत्व करत आहेत ज्यांना क्रिकेटचा गंधही नाही. हा पूर्णपणे खेळाचा अपमान आहे."
कायदेशीर लढाई लढणार
माजी फलंदाज अजहरुद्दीन यांनी या अन्यायाविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य कारवाई करण्याची विनंती केली. अजहरुद्दीन म्हणाले की, "ही काही नवीन बाब नाही. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादसोबत पास वाटपावरून एचसीएशी वाद झाला होता."
अजहरुद्दीन यांनी असा दावा केला की, "जे काही घडत आहे ते समजण्यापलीकडचे आहे आणि वैयक्तिकरित्या यामुळे मला खूप वाईट वाटत आहे. मला एचसीएच्या निवडणुकीत भाग घेण्याची परवानगी दिली गेली नाही, कारण मी यंत्रणेतील भ्रष्टाचार उघड केला. हीच सत्यता मला लक्ष्य बनवण्याचे कारण ठरली."
नेमके प्रकरण काय
हे प्रकरण २०१९ मधील आहे. जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्याच वर्षी २५ नोव्हेंबर रोजी एक बैठक बोलावण्यात आली, ज्यामध्ये नॉर्थ स्टँडचे नाव बदलून 'अझरुद्दीन स्टँड' असे ठेवण्याचे मान्य करण्यात आले. याआधी नॉर्थ स्टँडला व्हीव्हीएस लक्ष्मण स्टँड म्हणून ओळखले जात होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये एचसीए समितीच्या एका सदस्यानेच तक्रार दाखल केली. मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावावर स्टँड ठेवल्याने एचसीएच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा त्यात करण्यात आला. एचसीएच्या नियम क्रमांक ३८ नुसार, परिषदेचा कोणताही सदस्य स्वतःच्या बाजूने निर्णय घेऊ शकत नाही.
याआधीही हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानही वादात सापडले. एसआरएच संघ व्यवस्थापनाने एचसीएवर आरोप केला होता की, त्यांचे वरिष्ठ अधिकारी तिकीट विक्रीच्या बाबतीत हस्तक्षेप करत आहेत. अशा परिस्थितीत, एसआरएच व्यवस्थापनाने त्यांचे होम ग्राउंड हलवण्याची धमकीही दिली होती.