यापुढे 'इथे' होणार भारत- पाक सामने

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

अखेर चम्पियन्स क्रिकेट करंडकातील लढतींचा प्रश्न गुरुवारी मिटला. भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार नाही. तसेच, पाकिस्तानी संघ भारतात खेळणार नाही. आयसीसीकडून अशा प्रकारचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार आता पुढल्या वर्षी २०२५मध्ये होणारा चॅम्पियन्स करंडक पाकिस्तानात होणार असून त्यामधील भारतीय संघाच्या लढती इतरत्र खेळवण्यात येणार आहेत. आयसीसीकडून २०२७पर्यंत या करारपद्धतीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. 

२००८मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तिथपासून भारतीय संघ पाकिस्तानात गेलेला नाही. दोन देशांमधील अखेरची द्विपक्षीय मालिका २०१२मध्ये पार पडली होती. आता २०२५मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स करंडकाचे आयोजन होत आहे. सुरक्षेच्या अभावी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही, अशी भूमिका बीसीसीआयकडून घेण्यात आली. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकाचे आयोजन तोंडावर आले असतानाही वेळापत्रक निश्चित करण्यात आले नव्हते. आयसीसीकडून अंतिम निर्णय घेण्यात आल्यानंतर आता चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनाचा तिढा सुटला आहे.  

स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर 
आयसीसीकडून चॅम्पियन्स करंडकाबाबतही माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून या करंडकाच्या वेळापत्रकाबाबत सांगण्यात आले, की लवकरच लढतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. 

भारतातील स्पर्धा 
 २०२५ ते २०२७ या दरम्यान भारतात दोन आयसीसीच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये २०२५मध्ये महिला एकदिवसीय विश्वकरंडकाचा समावेश आहे. तसेच, २०२६मध्ये पुरुषांच्या टी-२० विश्वकरंडकाचाही समावेश आहे. या दोन स्पर्धांमधील पाकिस्तानच्या लढती इतर ठिकाणी खेळवण्यात येतील.

पाकिस्तानातील स्पर्धा 
पाकिस्तानात पुढल्या वर्षी चॅम्पियन्स करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील भारतीय पुरुष संघाच्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येण्याची शक्यता आहेत. तसेच, आयसीसीचा हा नवा करार पुढे सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २०२८मध्ये पाकिस्तानात होत असलेला महिलांचा टी-२० विश्वकरंडकही नव्या करारानुसार होण्याची शक्यता आहे. याचमुळे या स्पर्धेतील भारताच्या लढ़ती इतर ठिकाणी होतील. सध्या तरी आयसीसीकडून अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आगामी काळात काही बदल झाल्यास नियमातही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत पाक लढती आता तरी त्या त्या देशांमध्ये होणार नाहीत.

हायब्रिड मॉडेलचा अवलंब 
  • पाकिस्तानातील चॅम्पियन्स करंडकासाठी हायब्रिड मॉडेलचा अवलंब करण्यात आला आहे. 
  • पाकिस्तान क्रिकेट मंडळाने यासाठी आयसीसीकडे महसुलाची मागणी केली होती; मात्र आयसीसीकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा तशी चर्चाही करण्यात आलेली नाही. 
  • त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नसल्याचेही यावरून प्रकर्षाने दिसून येत आहे. भविष्यातही असेच होण्याची शक्यता याप्रसंगी नाकारता येत नाही.

    'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

    Awaz Marathi WhatsApp Group 
    Awaz Marathi Facebook Page

    Awaz Marathi Twitter