गेल्या १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना खेळल्यानंतर शमी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आता तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना संपल्यानंतर शमीने भारतीय संघाच्या नेटमध्ये गोलंदाजी केली.
"मी आता तंदुरूस्त आहे, मला आता कोणत्याही वेदना होत नाहीत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आपला विचार करण्यात यावा, यासाठी मी एक किंवा दोन रणजी सामन्यात खेळणार आहे." असे मत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने व्यक्त केले.
शमीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. पुनर्वसन प्रक्रिया सुरू असताना पुन्हा त्याच्या गुडघ्यामध्ये सूज आल्याचे रोहित शर्मा काही दिवसांपूर्वी म्हणाला होता; पण आता शमी लवकरच पूर्ण तंदुरुस्त होणार असल्याचे समजते.
"रविवारी भारतीय संघाच्या नेटमध्ये गोलंदाजी केल्यामुळे मी फार आनंदी आहे. पायावर जास्त भर पडू नये, म्हणून मी अर्ध्या रनअपने गोलंदाजी केली; पण आज मी पूर्ण जोशात मारा केला. त्यानंतरही माझ्या पायात कोणत्याही वेदना जाणवल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी जाणार की नाही याबाबत प्रत्येक जण विचारणा करत आहे; परंतु हा दौरा अजून दूर आहे. तोपर्यंत मी मॅच फिटनेससाठी एक किंवा दोन रणजी सामने खेळणार आहे," असे शमी म्हणाला.
शमी याआधी बंगालकडून रणजी खेळला आहे. बंगालचे पुढचे रणजी सामने २६ ऑक्टोबरपासून केरळविरुद्ध आणि ६ नोव्हेंबरपासून कर्नाटकविरुद्ध होणार आहे. "लगेचच पुढच्या सामन्यात मी खेळणार की नाही हे आताच सांगू शकत नाही; पण २० ते ३० षटके गोलंदाजी करू शकतो, हा विश्वास आल्यानंतर डॉक्टर मला हिरवा कंदील दाखवतील." असे शमीने सांगितले.