दुखापतग्रस्त असूनही सिराजने केली गोलंदाजी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
मोहम्मद सिराज जसप्रीत बूमरा
मोहम्मद सिराज जसप्रीत बूमरा

 

भारतीय क्रिकेट संघाला अॅडलेडनंतर ब्रिस्बेन कसोटीतही आतापर्यंत निराशेचा सामना करावा लागला असला तरी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने सहकारी मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे. बुमरा याप्रसंगी म्हणाला की, सिराजने दुखापतीसह या कसोटीत गोलंदाजी केली. वेदना होत असतानाही त्याने मैदानात किल्ला लढवला.

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियन संघातील पहिल्या डावात २३.२ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने पाच षटके निर्धाव टाकली. तसेच, ९७ धावा देताना दोन फलंदाजांनाही बाद केले. जसप्रीत बुमरा या वेळी पुढे म्हणाला की, पर्थ व अॅडलेड येथील कसोटी सामन्यांमध्ये सिराज तंदुरुस्त होता; मात्र ब्रिस्बेन कसोटीआधी त्याने मला दुखापतीबाबत सांगितले. या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने गोलंदाज केली. 

एवढेच नव्हे तर विकेट्सही घेतल्या. दुखापत असतानाही तो थांबला नाही. तसेच, ड्रेसिंग रूममध्ये गेला नाही. त्याला माहीत होते की, तो ड्रेसिंग रूममध्ये गेला असता तर भारतीय गोलंदाजी विभागावर दडपण आले असते. त्याची लढण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे.

एकमेकांना दोष देणार नाही 
जसप्रीत बुमरा याने अॅडलेडनंतर ब्रिस्बेन कसोटीतील अपयशाला कोणा एका खेळाडूला जबाबदार धरले नाही. तो म्हणाला, त्याने अमुक चूक केली, या खेळाडूने असे करायला नको होते, असे मी बोलणार नाही. कारण टीम इंडिया संघ बांधणीतून जात आहे. या संघामध्ये नवे खेळाडू आलेले आहेत. ऑस्ट्रेलियात खेळताना कस लागतो. प्रत्येक खेळाडू जन्मताच कौशल्य घेऊन येत नसतो. प्रत्येक खेळाडू अनुभवातून शिकत असतो. हळूवारपणे त्याच्यामध्ये बदल होतो. याच कारणामुळे कोणालाही दोष देणार नाही.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter