तब्बल १२८ वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 15 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन होणार, हे निश्चित झाल्यावर सुवर्णपदकाच्या शर्यतीत सहा संघांमध्ये संघर्ष होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागांत प्रत्येकी सहा संघ असणार आहेत.
  
यापूर्वी १९०० मध्ये पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेट हा खेळ खेळण्यात आला होता. ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात दोन दिवसांचा एकमेव सामना झाला होता, पण त्या सामन्याला अधिकृत दर्जा देण्यात आला नव्हता. आता लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेट हा खेळ टी-२० प्रकारात खेळण्यात येणार आहे. पुरुष आणि महिला विभागांत प्रत्येकी सहा संघ असतील, असे संयोजकांनी सांगितले. प्रत्येक संघ १५ खेळाडूंचा असेल. त्यामुळे पुरुष महिला असे एकूण १८० क्रिकेटपटू असतील.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने या लॉस एंजेलिस स्पर्धेसाठी क्रिकेटसह बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉस आणि स्क्वॉश या नव्या खेळांचा समावेश केला आहे. २०२४ मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिंपिकच्या तुलनेत या लॉस एंजेलिस ऑलिंपिक स्पर्धेत २२ अधिक पदके असतील. एकूण ३५१ मेडल इव्हेंट्स असतील. तसेच एकूण खेळाडूंची संख्या १०,५०० एवढीच कायम असेल, त्यात नव्या खेळांतील ६९८ खेळाडूंचा समावेश आहे.

ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जेवढे पुरुषांचे संघ असतील, तेवढेच महिलांचेही संघ असून, समानता राखण्यात आली आहे.

रँकिंगनुसार संधी शक्य
भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य आहेत, तर ९४ देश हे सहयोगी गटातील सदस्य आहेत. यातून प्रत्येकी सहा देश पात्र ठरतील. पात्रता निकष कसे असतील, हे अजून निश्चित झालेले नाही, मात्र यजमान असल्यामुळे अमेरिका संघाला थेट प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर देशांमध्ये पाच जागांसाठी स्पर्धा असेल. आयसीसी रँकिंगनुसार पहिल्या पाच संघांना प्रवेश मिळेल, असे सांगितले जात आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter