कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० धावा - ३ षटके (भारत)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० धावा - १०.१ षटके (भारत)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावा - १८.२ षटके (भारत)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० धावा - २४.२ षटके (भारत)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५० धावा - ३०.१ षटके (भारत)
भारत विरुद्ध बांगलादेश संघात कानपूरला दुसरा कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाकडून टी२० स्टाईल फलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे वर नमुद केलेले सर्व विश्वविक्रम भारताकडून या सामन्यात पहिल्या डावात नोंदवले गेले.
या सामन्यावर आधीच पावसाचे सावट होते. पावसामुळे पहिल्या दिवशी ३५ षटकांचाच खेळ झाला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळही वाया गेला होता. परंतु, चौथ्या दिवशी पूर्ण खेळ झाला. चौथ्या दिवशी अनेक घडामोडी घडलेल्या दिसल्या.
या सामन्यात बांगलादेश प्रथम फलंदाजीला उतरले होते. त्यांनी पहिल्या दिवशी ३५ षटकात ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. मोमिनुल हक ४० धावांवर, तर मुश्फिकूर रहिम ६ धावांवर नाबाद होता. तिथून चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. पण नंतर बांगलादेशचा पहिला डाव दुसऱ्या सत्रात ७४.२ षटकात २३३ धावांवर संपुष्टात आला.
बांगलादेशकडून डावात मोमिनुलने चांगली फलंदाजी केली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने १९४ चेंडूंत १७ चौकार व १ षटकारासह १०७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय या डावात बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसैन शांतो यालाच ३० धावांचा टप्पा पार करता आला. त्याने ३१ धावा केल्या. पण बाकी कोणाला २५ धावाही पार करता आल्या नाहीत.
भारताच्या गोलंदाजांकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने १ विकेट घेतली.
त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. हीच लय नंतर सर्वच भारतीय खेळाडूंनी कायम ठेवलेली दिसली.
या सामन्यातील आधीच दोन दिवस वाया गेलेले असल्याने आता निकाल लावण्यासाठी दोन दिवसच बाकी असल्याने भारतीय संघाने हा पवित्रा स्विकारल्याचे दिसून आले. कारण ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचाही भाग असल्याने सामन्यात निकाल लागला, तर त्याचा परिणाम भारत आणि बांगलादेशवरही होणार आहे.
भारताकडून रोहित आणि जैस्वालने ३ षटकात ५० धावा पूर्ण केल्या. पण रोहित चौथ्या षटकात ११ चेंडूंत २३ धावा करून बाद झाला. रोहितही बाद झाल्यानंतरही जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी धावांची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भागीदारीदरम्यान जैस्वालने ५१ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह ७२ धावांची खेळीही केली. गिलनेही ३६ चेंडूत ३९ धावा केल्या.
मात्र, ऋषभ पंतला फार काही करता आले नाही. तो ९ धावा करून बाद झाला. पण विराट कोहली आणि केएल राहुलनेही वादळी खेळ करत अर्धशती भागीदारी केली. त्यांच्या वादळी खेळामुळे २४.२ षटकातच भारताने २०० धावाही पार केल्या होत्या. पण विराट कोहलीला शाकिब अल हसनने त्रिफळाचीत केले. विराटने ३५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार ४७ धावा केल्या.
केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. नंतर मात्र भारताने रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि आकाश दीप यांच्या विकेट्स झटपट गेल्या. यानंतर भारताचा कर्णधार रोहितने फार वेळ वाट न पाहाताच ३४.४ षटकात ९ बाद २८५ धावा केलेल्या असताना डाव घोषित केला.
त्यामुळे भारताकडे ५२ धावांची भागीदारी आली. यामुळे बांगलादेशचा दुसरा डावही चौथ्याच दिवशी सुरू झाला. चौथ्या दिवस अखेर बांगलादेशने ११ षटकात २ विकेट्स गमावत २६ धावा केल्या. शादमन इस्लाम ७ धावांवर नाबाद आहे, तर मोमिनुल हक शुन्यावर नाबाद आहे. झाकिर हसन १० धावांवर आणि हसन मेहमुद ४ धावांवर बाद झाले. या दोघांनाही आर अश्विनने बाद केले.