चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे. अशात पुढच्यावर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्तानने चांगलीच कंबर कसल्याची दिसून येत आहे. त्यांनी अनेक वर्षांनी आयसीसी स्पर्धा आयोजित करण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अशी माहिती मिळाली होती की पाकिस्तान कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे या स्पर्धेतील सामने आयोजित करण्याचा विचार करत आहेत.
आता इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने या स्पर्धेच्या वेळापत्रकाचा जो ड्राफ्ट बनवला आहे, त्यानुसार भारताचे सर्व सामने लाहोरला खेळवण्याची योजना आहे. लाहोरला अंतिम सामना खेळवण्याचाही विचार आहे.
भारताचे सामने एकाच शहरात ठेवण्यामागे कारण म्हणजे यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षितेबाबत आणि प्रवासावेळी उद्भवणाऱ्या समस्यांना टाळता येईल. याशिवाय लाहोर हे वाघा बॉर्डरच्या जवळ असल्याने भारतीय चाहत्यांना प्रवासासाठी सोपा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
पाकिस्तान क्रिकेट बार्डाचे अध्यक्ष मोहसिन नाकवी यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की त्यांनी स्पर्धेच्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट आयसीसीकडे पाठवला आहे. ही स्पर्धा पुढीलवर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होऊ शकते.
दरम्यान, या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आठही संघ पाकिस्तानला जाणार की नाही, यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे; विशेषत: भारतीय संघाबाबत.
भारताने गेल्या 17 वर्षात एकदाही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पण आता 17 वर्षांनी भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार की नाही, याबाबतचा निर्णय भारत सरकार आणि बीसीसीआयच्या हातात आहे.
गेल्यावर्षी पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेचाही आयोजक होता. मात्र भारतीय संघाला पाकिस्तानला जाण्यास नकार मिळाल्याने हायब्रिड मॉडेलमध्ये ही स्पर्धा पार पडली. यामध्ये भारताचे सर्व सामने तसेच अंतिम सामनाही श्रीलंकेमध्ये झाला होता. तसेच त्यानंतर झालेल्या 2023 वनडे वर्ल्डकपसाठी पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता.
दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 2009 मध्ये श्रीलंका संघावर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये 6 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवले गेले नव्हते. पण 2015 पासून पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले.
त्यानंतर गेल्या 8 वर्षात बऱ्याच संघांनी पाकिस्तान दौरा केला आहे. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या 8 संघांपैकी भारत वगळता सर्व संघांनी पाकिस्तानचा दौरा केला आहे.
त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत अंतिम निर्णय कधी घेतले जाणार, हे पाहावे लागेल.