दुबईत चॅम्पियन्स करंडक २०२५च्या अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघात खेळवण्यात आला. या रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडला नमवत भारताने तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन बनला आहे. चॅम्पियन ट्रॉफीत एकही सामना न गमावता चॅम्पियन बनणारा भारत एकमेव देश ठरला आहे.
भारताने तब्बल एका तपानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. यानंतर भारतात जल्लोषाला सुरुवात झाली. चाहत्यांनी भारतीय संघावर आणि खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहले, “आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्याबद्दल आमच्या क्रिकेट संघाचा अभिमान आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळ केला आहे. आमच्या संघाचे अष्टपैलू कामगिरीसाठी अभिनंदन.”
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करत लिहले, "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन. तीनदा ट्रॉफी जिंकणारा भारत हा एकमेव संघ ठरला आहे. क्रिकेटमध्ये इतिहास रचल्याबद्दल खेळाडू, व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफ सर्वोच्च कौतुकास पात्र आहेत. भारतीय क्रिकेटला उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते."
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यांनी लिहले, “रोमहर्षक सामना ! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडवर मेन इन ब्लूचा ऐतिहासिक विजय! २००२, २०१३ मध्ये तीनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा एकमेव संघ म्हणून मेन इन ब्लू उंच उभा आहे. आता १२ वर्षांनंतर, पुन्हा एकदा हा मुकुट आपल्या नावावर आहे! टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या हुशारीने संघाचे नेतृत्व केले. गोलंदाजांनीही या प्रसंगी उल्लेखनीय कौशल्य आणि अचूकता दाखवत चांगली कामगिरी केली. हा संपूर्ण सांघिक प्रयत्न होता.”
पुढे त्यांनी लिहले, “हा विजय केवळ एक ट्रॉफी नाही; तो टीम इंडियाच्या कठोर परिश्रमाचा आणि अतूट आत्म्याचा उत्सव आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्यासाठी खरोखरच एक अविस्मरणीय क्षण आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहले, “किवींवर दणदणीत विजय मिळवंत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले. न्यूझीलंड क्रिकेट संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांची अचूक गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा डाव २५१ धावांवर रोखला.”
पुढे ते म्हणाले, “२५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय फलंदाजांनी नेत्रदीपक फलंदाजीचे प्रदर्शन करत किवी गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. स्वतः पुढाकार घेत रोहित शर्माने कप्तानी खेळी खेळत स्फोटक अर्धशतक ठोकले. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के.एल.राहुल, अक्षर पटेल तसेच सर्वच फलंदाजांनी कर्णधाराला साजेशी साथ दिली. अटीतटीच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दणदणीत पराभव करत विजयश्री खेचून आणली. टीम इंडियाच्या या देदीप्यमान यशाचा प्रत्येक भारतीय नागरिकाला नक्कीच सार्थ अभिमान आहे. तमाम देशवासीयांचे तसेच भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. भारतीय क्रिकेट संघाला भावी क्रिकेटसाठी हार्दिक शुभेच्छा.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देताना म्हटले, “धडाकेबाज सुरुवात, दिमाखदार शेवट, शानदार खेळी. अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघानं आपल्या विजयाची मोहोर उमटवली. आयसीसी मेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये झालेल्या अंतिम सामान्यात भारतीय संघानं आपलं वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला. या दिमाखदार विजयासाठी मी भारतीय संघातील तमाम खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो. तसंच प्रशिक्षकांचं देखील अभिनंदन करतो. आज संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा होत आहे. देशवासियांना आपल्या खेळाडूंचा सार्थ अभिमान आहे.”
या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. फलंदाज रचिन रवींद्रने सुरुवातीला चांगला खेळ दाखवला. संघाला त्याने चांगली सुरुवात करून दिली. परंतु कुलदीपच्या फिरकीच्या जाळ्यात तो अडकला. त्या पाठोपाठ कुलदीपणे केन विल्यमसनला लेग स्पीन टाकून झेलबाद केले.
यानंतर संघाची नाजुक परिस्थिती असताना डरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. गरज लक्षात घेत धोका न पत्करता दोघांनी एकेरी धावांवर भर देत फलंदाजी केली. संघासाठी त्यांनी ५० धावांची भागीदारी केली. तर शेवटी मायकेल ब्रेसवेलने केलेल्या नाबाद अर्धशतकाने न्यूझीलंडला ५० षटकांच्या अखेरीला सात बाद २५१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकीय भागीदारी केली. १०५ धावांवर शुभमन गिल आउट झाला. त्या पाठोपाठ विराटदेखील बाद झाला. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा ७६ धावा करून बाद झाला.
श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरत एक मजबूत भागीदारी केली. शेवटी के.ल. राहुल, हार्दिक पांड्या आणि जेडेजाने उत्कृष्ट खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.