स्पर्धेत बौद्धिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिक दबावही - गुकेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
मायदेशात परतणारा विश्वविजेता डी. गुकेश, सोबत आई आणि वडील.
मायदेशात परतणारा विश्वविजेता डी. गुकेश, सोबत आई आणि वडील.

 

चीनचा गतविजेता डिंग लिरेन याला पराभूत करीत विश्वविजेता ठरलेल्या डी. गुकेश याचे सोमवारी मायदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आले. चेन्नईमध्ये पाऊल ठेवताच गुकेशने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, जागतिक लढतीत फक्त बुद्धिबळासाठी कस लागला नाही, तर मानसिक व भावनिक दबावाचाही सामना करावा लागला. पॅडी अप्टॉन यांच्या मार्गदर्शनामुळे मला याचा समर्थपणे सामना करता आला.

डी. गुकेश मायदेशात परतताच तो लहानपणी ज्या शाळेमध्ये शिकला, त्या वेलाम्मल विद्यालयाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत त्याने आपली मते व्यक्त केली. गुकेश याप्रसंगी आवर्जून म्हणाला की, एप्रिल महिन्यात मी आव्हानवीरांची स्पर्धा जिंकलो. त्यानंतर संदीप सिंघल यांना मेंटर ट्रेनर (प्रशिक्षक) याबाबत विचारले. त्यांनी तत्काळ पेंडी अप्टॉन यांचे नाव सुचवले. जागतिक स्तरावर त्यांनी खूप काम केले आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

तमिळ सरकारचे आभार
डी. गुकेश याने याप्रसंगी तमिळनाडू सरकारचेही आभार मानले. तो म्हणाला, तमिळनाडू सरकारकडून मला चेन्नई ग्रँडमास्टर स्पर्धेसाठी मोलाची मदत मिळाली. त्यामुळेच मला ती स्पर्धा जिंकता आली व आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी पात्र होता आले. अशाप्रकारचे सहकार्य लाभल्यास असंख्य युवा खेळाडू बुद्धिबळ या खेळाकडे वळू शकतील. 

…म्हणून तो विश्वविजेता 
पॅडी अप्टॉन यांनीही डी. गुकेशचे कौतुक केले. ते म्हणाले, मला असे वाटते की गुकेशची एक बाब खरोखरच वेगळी आहे. त्याची विचार करण्याची पद्धत, तसेच बुद्धिमत्तेची समज याशिवाय एखादी बाब कशाप्रकारे करता येऊ शकते याबाबतची जाण. पहिल्या फेरीत त्याचा पराभव झाला असतानाही त्याचे खेळावरील लक्ष विचलित झाले नाही. १४ फेरीपर्यंत तो टिकून राहिला. जगज्जेता होण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. त्याने हे करून दाखवले.

छंद म्हणून सहभाग 
डी. गुकेशचे वडील डॉ. रजनीकांत हे व्यवसायने सर्जन आहेत. ते या वेळी म्हणाले, बुद्धिबळात करिअर घडावे यासाठी आम्ही त्याला खेळायला पाठवले नाही. शाळेमध्ये छंद म्हणून त्याने सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आला. पण जेव्हा त्याचे मन या खेळामध्ये लागले, तिथपासून त्याला सहकार्य करण्याचे ठरवले. त्यानेही प्रचंड मेहनत केली. गुकेश हा पराभवामधून तसेच विजयामधून शिकत असतो, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, गुकेश विश्व अजिंक्यपदाची लढत सिंगापूर येथे खेळत असताना वडीलही त्याच्यासोबत तिथे होते 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter