दोन पिढ्यांत तुलना करणे अन्यायकारक - कपिलदेव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
 कपिलदेव, जसप्रीत बूमराह
कपिलदेव, जसप्रीत बूमराह

 

एका पिढीतील क्रिकेटपटूची दुसऱ्या पिढीतील क्रिकेटपटूशी तुलना करणे योग्य नव्हे, असे स्पष्ट मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे.

जसप्रीत बुमराहने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १५०पेक्षा अधिक षटके गोलंदाजी केली. त्यानंतर त्याच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे सिडनी कसोटीच्या अखेरच्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजी केली. भारतीय क्रिकेट संघ १९९१-९२मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळला. या मालिकेत कपिलदेव यांनी जवळपास ३०० षटके गोलंदाजी केली. त्यानंतरही ते थकले नाहीत. यामुळे कपिल व बुमराह  यांची तुलना होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर कपिल यांनी आपले मत व्यक्त केले. 

प्रोफेशनल गोल्फ टूअर ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कपिलदेव म्हणाले, एका पिढीतील क्रिकेटपटूची तुलना दुसऱ्या पिढीतील क्रिकेटपटूशी करू नये. अशा तुलनेची गरज नाही, कारण आताच्या काळात एका दिवसाला तीनशेच्यावर धावा केल्या जात आहेत. आमच्या काळात त्या होत नव्हत्या. 

निवड समितीच्या निर्णयावर शंका नको 
भारताच्या निवड समितीकडून इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली. यामध्ये यशस्वी जयस्वाल व रिषभ पंत या दोघांना स्थान देण्यात आले नाही. याबाबत कपिलदेव म्हणाले, यशस्वी व रिषभ यांना संघात स्थान देण्यात आले नाही, म्हणून निवड समितीच्या निर्णयावर शंका घेऊ नये. त्यांनी एखादा विचार मनामध्ये ठेवून विचार केला असावा, तसेच दोघांना वगळण्याच्या निर्णयावरही मी काहीही बोलणार नाही. निवड समितीवर टीकाही करणार नाही. निवड समितीकडून आगामी काळासाठी योजना आखली गेली असेल, त्यामुळे त्यांनी अशाप्रकारचे पाऊल उचलले असावे. 

कुठे थांबायचे हे 'त्यांना' माहीत 
रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याबाबत मत व्यक्त करताना कपिलदेव म्हणाले की, रोहित व विराट हे दोघेही महान खेळाडू आहेत. त्यांना केव्हापर्यंत खेळायचे अन् कुठे थांबायचे हे माहीत आहे. निवृत्तीचा निर्णयही ते स्वतः घेतील, तसेच जसप्रीत बुमराला कर्णधारपदी निवडल्यानंतर त्यासाठी तो योग्य आहे की नाही, याकरिता त्याला वेळ देणे आवश्यक आहे, असेही कपिल यांनी आवर्जून म्हटले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter