Champions Trophy 2025 : भारताचा नकार पाकिस्तानच्या पथ्यावर पडणार?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
Rohit Sharma and Babar Azam
Rohit Sharma and Babar Azam

 

चॅम्पियन्स ट्रॉफी  २०२५ च्या बाबतीत एक मजेशीर बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे आणि लाहोर स्टेडियमचेही नुतनीकरण सुरू आहे. पण, भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तामध्ये जाणार का, हा खरा प्रश्न आहे. BCCI ने संघ पाठवणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतल्याने आशिया चषक स्पर्धेप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीही हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्याची शक्यता बळावली आहे. पण, यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय संघ पाकिस्तानात न येणं फायद्याचे ठरणार आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले. त्यामुळे यजमान PCB ला आर्थिक नुकसान सहन करावा लागला. आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठीही हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला गेला आहे. त्यानुसार भारताचे सामने संयुक्त अरब अमिराती किंवा श्रीलंका येथे खेळवण्यात यावे, अशी मागणी आहे. मात्र, यावेळी PCB कडून कोणताच विरोध होताना दिसत नाही. त्यामागे कारणही तसेच आहे. भारताचे सामने पाकिस्तानबाहेर झाल्यास आयसीसी PCB ला आर्थिक मदत करणार आहे.

याचा अर्थ भारताचे पाकिस्तानात न येणे PCB च्या फायद्याचे ठरणार आहे. आयसीसीकडून त्यांना अतिरिक्त खर्च मिळणार आहे. त्यामुळे आशिया चषक २०२३ नुसार चॅम्पियन्स ट्रॉफीही हायब्रिड मॉडेलमध्ये होईल याची शक्यता बळावली आहे.

भारताला मनवण्याची जबाबदारी आयसीसीची
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता BCCI ला पाकिस्तान दौरा करण्यासाठी मनवण्याची जबाबदारी आयसीसीकडे सोपवली आहे. PCB ने या स्पर्धेच्या वेळापत्रकाचा आराखडा आयसीसीला दिला आहे. १९ फेब्रुवारी २०२५ पासून ही स्पर्धा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. २०१७ मध्ये झालेल्या शेवटच्या चॅम्पियन्स ट्ऱ़ॉफीचे जेतेपद पाकिस्तानने पटकावले होते. त्यामुळे गतविजेते म्हणून ते पुढच्या वर्षी मैदानावर उतरतील. त्याचवेळी १९९६च्या वर्ल्ड कपनंतर आयसीसी स्पर्धा आयोजनाची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे.

"पीसीबीने आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान या नात्याने जे आवश्यक होते, ते केले आहे. त्यांनी कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि स्वरूप सादर केले आहे. कार्यक्रमाचे बजेटही सादर केले आहे," असे सूत्रांनी सांगितले.
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter