पुढच्या महिन्यात पाकिस्तान- दुबईत सामने होत असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला आत्तापासूनच विरोधाची धग लागू लागली आहे. अफगाणिस्तानविरुद्धचे सामने खेळू नका, असा विरोध इंग्लंडनंतर आता दक्षिण आफ्रिकेतूनही होत आहे.
अफागाणिस्तानविरुद्ध न खेळण्यासाठी आफ्रिकेच्या जनतेतून आवाज उठत आहे आणि त्यामध्ये त्यांचे क्रीडामंत्री सहभागी झाले आहेत. आयसीसी स्वतःचेच नियम पाळत नसल्याचाही आरोप या क्रीडामंत्री गेटॉन मॅकेन्झी यांनी केला आहे.
अफागाणिस्तानमध्ये राजवट असलेल्या तालिबान सरकारने महिलांचे क्रीडा क्षेत्र हद्दपार केले आहे, तसेच महिला क्रिकेट संघालाही बंदी घातली आहे. हा केवळ माझा एकट्याचा विरोध नाही, तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानविरुद्धचे क्रिकेट संबंध तोडून टाकायला हवेत. माझ्या हाती निर्णय असता, तर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय मी घेतला असता, असे मॅकेन्झी म्हणाले.
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने महिलांवर निर्बंध लादलेले आहेत. पुरुषांप्रमाणे महिलांना समान न्याय दिला जात नाही, त्यामुळे इतर देशांतून विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना २१ फेब्रुवारी रोजी कराचीत नियोजित आहे. काही दिवसांपूर्वी असाच विरोध इंग्लंडमधूनही झालेला आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळू नका, असे इंग्लंडमधील १६० पेक्षा अधिक राजकीय व्यक्तींनी म्हटलेले आहे. इंग्लंड-अफगाणिस्तान सामना २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
आयसीसी स्वतः पुरुषांप्राणे महिलांच्याही क्रिकेटला समान न्याय देत त्यांनाही प्राधान्य देत आहे. महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी आयसीसी प्रयत्न करत आहे. एकीकडे स्वतः महिला क्रिकेटला प्राधान्य द्यायचे आणि महिला क्रिकेटवर अन्याय करणाऱ्या अफगाणिस्तानला कसे खेळायला देता, असा प्रश्न मॅकेन्झी यांनी उपस्थित केला.
क्रिकेट संघटनेतील सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत श्रीलंका क्रिकेटवर बंदी घातली होती. मग असा हस्तक्षेप अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये का सहन केला जातोय, असाही प्रश्न मॅकेन्झी यांनी विचारला आहे.