BCCI चा पाकिस्तानात खेळण्यास नकार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

२०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी भारत पाकिस्तानला जाणार नाही, हे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पष्ट केले आहे. BCCI ने या संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) नुकत्याच झालेल्या चर्चेत हे स्पष्ट सांगितले आहे. बीसीसीआयने सुरक्षेच्या चिंतेचा हवाला दिला आहे आणि त्यांचे सर्व खेळ दुबईमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानने ही मागणी मान्य केल्याची बातमी काल आली होती. त्याला आज पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

'ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यात बदल करण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही त्यांना पत्र लिहिले आहे आणि आमचे खेळ दुबईला हलवण्यास सांगितले आहे,' अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. PCB ने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कराची, लाहोर आणि रावळपिंडी ही शहरे निवडली आहेत. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत आठ संघ भाग घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार BCCI ने सरकारशी सल्लामसलत करून पाकिस्तानबाबत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी आशिया चषकाचे सामनेही भारताने यजमान पाकिस्तानच्या दबावाला न जुमानता श्रीलंकेत हलवण्यात यश मिळवले होते.

BCCI ने लेखी पत्र द्यावे, मग...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी लाहोरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आमची स्पष्ट भूमिका आहे की BCCI ला काही अडचण असेल तर त्यांनी तसे आम्हाला लेखी सांगावे. आम्ही कोणत्याही 'हायब्रीड मॉडेल' बद्दल बोललो नाही, परंतु आम्ही याबद्दल बोलण्यास तयार आहोत. भारतीय मीडिया तसे वृत्त चालवत असतील तर आयसीसीने आम्हाला काहीतरी पत्र दिले असावे किंवा भारतीय बोर्डाने हे कुठेतरी लिहिले असावे. आतापर्यंत माझ्याकडे किंवा पीसीबीकडे असे कोणतेही पत्र पोहोचलेले नाही.

नक्वी पुढे म्हणाले, 'आम्हाला क्रिकेट आणि राजकारण वेगळं ठेवायचं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आमची तयारी सुरू आहे. भारताने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यास, आम्ही आमच्या सरकारचा सल्ला घेऊ आणि त्यानुसार प्रतिसाद देऊ. कारण यापूर्वी अनेक प्रसंगी BCCI शी आमचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण राहिले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात न आल्यास भविष्यातील कोणत्याही कार्यक्रमासाठी पाकिस्तानने प्रवास करायचा की नाही हे सरकार ठरवेल.

२०१२-१३ मध्ये पाकिस्तान मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर उभय संघांमध्ये कोणतेही द्विपक्षीय मालिका झालेली नाही.