मुळात चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे स्वतःच्या देशात होणारे संयोजन धोक्यात आले तरीही या करंडकाचे प्रदर्शन पाकव्याप्त काश्मीरमधील काही शहरांत करण्याच्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या प्रयत्नांना आयसीसीने दणका दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत तेथे करंडक नेता येणार नाही, असा सज्जड दम दिला आहे.
विजेत्या संघाला दिला जाणारा चॅम्पियन्स करंडक आज पाकिस्तानमध्ये दाखल झाला आणि येत्या काही दिवसांत हा करंडक स्कारद्, हुमझा आणि मुझफ्फराबाद या पाकव्याप्त शहरांत प्रदर्शनासाठी नेण्यात येणार होता. मुळात हा करंडक कोठे न्यायचा याला आयसीसीची मान्यता लागते, मात्र पाकिस्तान मंडळाने स्वतःच करंडक प्रदर्शनाचा कार्यक्रम जाहीर केला.
पाकिस्तान मंडळाचा हा डाव बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शहा यांच्या लक्षात आला आणि त्यांनी लगेचच आयसीसीकडे आक्षेप नोंदवला. १ डिसेंबर रोजी जय शहा आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
आयसीसीच्या कोणत्याही करंडकाचे प्रदर्शन आयसीसीच्या मान्यतेने आणि त्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे होत असते, परंतु पाकिस्तान मंडळाने स्वतःच जाहीर करून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. उद्या हा करंडक इस्लामाबाद येथे नेण्यात येणार होता. चॅम्पियन्स करंडकाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा.. गेट रेडी पाकिस्तान... असे घोषवाक्यही पाकिस्तान मंडळाने तयार केलेले आहे.
मुळात भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास स्पष्ट नकार दिलेला असल्यामुळे स्पर्धेचे भवितव्य अनिश्चित आहे. भारतीय क्रिकेट मंडळ हायब्रिड मॉडेलसाठी ठाम आहे, पण पाकिस्तान क्रिकेट मंडाळाला ते मान्य नाही. त्यांनी आपली भूमिका सोडली नाही, तर स्पर्धा रद्द होऊ शकते किंवा इतर देशात खेळवली जाऊ शकते.