कार्लोस अलकाराझने रचला इतिहास!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
कार्लोस अलकाराझ
कार्लोस अलकाराझ

 

स्पेनच्या अव्वल मानांकित कार्लोस अलकाराझने अखेर नोव्हाक जोकोविचची सेंटर कोर्टवरील तब्बल 10 वर्षाची दादागिरी संपवली आहे. आपले आठवे विम्बल्डन जिंकून फेडररशी बरोबरी करण्यासाठी कोर्टवर उतरलेल्या 36 वर्षाच्या नोव्हाक जोकोविचला अवघ्या 20 वर्षाच्या कार्लोसने पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभवाची धूळ चारली.

 

कार्लोसने 1-6, 7-6 (8/6), 6-1, 3-6, 6-4 अशी झुंज देत विजय मिळवला. कार्लोस हा विम्बल्डन जिंकणारा तिसरा सर्वात कमी वयाचा टेनिसपटू आहे. 

 

नोव्हाक जोकोविच हा विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर आपले आठवे विम्बल्डन जिंकण्याच्या इराद्याने उतरला होता. तसंही सेंटर कोर्टवर गेल्या दहा वर्षापासून जोकोविचला कोणी आव्हान देऊ शकलं नव्हतं. सर्बियाच्या या स्टार टेनिसपटूला सेंटर कोर्टवर अँडी मरेने 2013 मध्ये मात दिली होती. 

 

 

मात्र त्याच्यासमोर 20 वर्षाचा स्पेनचा एक लाढाऊ बाणा असलेला अलकाराझ होता. नोव्हाक जोकोविचने पहिला सेट 6 - 1 असा जिंकत दमदार सुरूवात केली. 36 वर्षाचा मुरलेला जोकोविच कार्लोसची सरळ सेटमध्येच शिकार करणार असे वाटत असतानाच.

 

नदालचा वारसा सांगणाऱ्या कार्लोसने दुसरा सेट 7 - 6 (8-6) असा कडवी झुंज देत जिंकला. कार्लोची झुंज पाहून अवाक झालेल्या जोकोविचला पुढच्या सेटमध्ये प्रतिकाराची संधीही न देता स्पेनच्या टेनिसपटूने तिसरा सेट 6 - 1 असा खिशात टाकला.

 

यानंतर जोकोविचने आपला सर्व अनुभव पणाला लावत चौथा सेट 6 - 3 असा जिंकत आपले आव्हान कायम ठेवले. मात्र यावेळी जोकोविच आणि काही प्रमाणात कार्लोसने देखील चुका केल्या. मात्र तरूण कार्लोसने पाचव्या सेटमध्ये जोकोविचला 6 - 4 अशी मात देत त्याचे आठ विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.