भारतावर पराभवाची मोठी नामुष्की

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पाऊस किंवा गोलंदाजांची किमया अशा दोन परावलंबी पर्यायांवर भारताची भिस्त असणाऱ्या भारतावर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावली. न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला. आता पुढचे दोन सामने पुणे आणि मुंबईत होणार आहेत.

तुटपुंज्या १०६ धावांची पाठराखण करत सामना जिंकण्याची किमया साधणे भारतीय संघाला कठीण आहे, याची कल्पना होती. झाले तसेच, कारण न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांनी भारतीय वेगवान गोलंदाजांनी केलेला तिखट मारा पचवून नंतर आठ गडी राखून कसोटीतील विजय हाती घेतला. बंगळूर कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी उपहाराअगोदर खेळ संपला. दोनही डावांत भन्नाट फलंदाजी करणाऱ्या राचिन रवींद्रला एकमुखी सामन्याचा मानकरी ठरवण्यात आले. 

पाऊस किंवा गोलंदाजांची किमया अशा दोन परावलंबी पर्यायांवर भारताची भिस्त होती. सकाळी हवामानाचा अंदाज चुकला. चिन्नास्वामी मैदानावर लख्ख सूर्यप्रकाश पडला. खेळ वेळेवर चालू झाल्यावर अगदी पहिल्या काही चेंडूतच जसप्रीत बुमराने किवी कप्तान टॉम लॅथमला पायचीत केले. पहिला एक तास बुमरा आणि सिराजने चांगलाच तिखट मारा करून फलंदाजांना अनेक प्रश्न विचारले. बुमराने पहिल्या डावात चांगली खेळी करणाऱ्या कॉनवेलाही पायचीत केले; पण त्यानंतर बिल यंग आणि रचिन रवींद्रने भारतीय गोलंदाजांना पुढे सरकायची संधी दिली नाही. उत्तर फलंदाज बुमरा खेळताना दचकत होते तिथे राचिनने बुमराला दोन कडक चौकार मैदानात फलंदाजीला आल्याक्षणी लगावले. 

एक तास मेहनत करून थकल्यावर वेगवान गोलंदाजांना विश्रांती देणे भाग पडले. रोहित शमनि फिरकी मारा चालू केल्यावर यंग राचिनने त्याचा फायदा घेत गरजेच्या १०७ धावा उपहाराअगोदर चोपून काढल्या. ३६ वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर न्यूझीलंड संघाने भारतात कसोटी सामना जिंकला. मालिकेतही १०० आघाडी घेतली.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभव झाला असला तरी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (डब्ल्यूटीसी) भारताचे अव्वल स्थान कायम राहिले आहे; मात्र गुणांची टक्केवारी काही प्रमाणात कमी आहे.

बंगळूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या ४६ धावांत दाणदाण उडाल्यानंतर आठ विकेटने हा सामना पराभूत होण्याची नामुष्की भारतावर आली. त्यामुळे भारताची निव्वळ सरासरी आता ६८.०६% अशी कमी झाली आहे. न्यूझीलंडने मात्र ४४.४४% अशी प्रगती करत चौथे स्थान मिळवले आहे.  भारताचे आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने शिल्लक आहेत. अशा सातपैकी चार सामन्यांत विजय मिळवला तर इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून न राहता भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे.

ताज्या गुणतक्त्यानुसार भारताच्या पाठीमागे ऑस्ट्रेलिया (६३.५०%) आणि श्रीलंका (५५.५६%) आहेत. याच श्रीलंका संघाने मायदेशात झालेल्या मालिकेत न्यूझीलंडला पाणी पाजले होते; पण न्यूझीलंडने भारतीय संघाने केलेल्या चुकांचा फायदा घेत बंगळूर कसोटीत भारताला पराभवाचा धक्का दिला आणि आपल्या आव्हानाला संजिवनी दिली. 

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका आहे. त्यावरही न्यूझीलंडचे भवितव्य अवलंबून असेल. याशिवाय ते भारतातील पुढच्या दोन कसोटींत कशी कामगिरी करतात हेसुद्धा महत्त्वाचे असणार आहे.

पुढच्या दोन कसोटींसाठी वॉशिंग्टनला स्थान
न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे आणि मुंबई येथे होणाऱ्या पुढच्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरचा अतिरिक्त खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात अगोदरच आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल असे चार फिरकी गोलंदाज आहेत. वॉशिंग्टन सुंदर हा संघातला पाचवा फिरकी गोलंदाज असेल. पुण्यातील कसोटी सामना २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान होत आहे. तर, मुंबईतील सामना १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter