मुश्ताक अली स्पर्धेत मोहम्मद शमीची अष्टपैलू कामगिरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 6 d ago
मुश्ताक अली स्पर्धेमध्ये खेळताना मोहम्मद शमी
मुश्ताक अली स्पर्धेमध्ये खेळताना मोहम्मद शमी

 

मोहम्मद शमी गेल्या २-३ महिन्यांपासून भारतीय संघात परतण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी तो प्रचंड मेहनतही घेताना दिसतो. शमी सध्या मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बंगाल संघाकडून खेळत आहे. आज चंदीगडविरूद्धच्या सामन्यात त्याने फटकेबाजी करत जलद ३२ धावांची खेळी केली. बंगालने हा सामना ३ धावांनी जिंकला आणि स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक दिली. शमीने सोशल मीडियावर आजच्या कामगिरीचा फोटो शेअर करत संघाच्या यशाबद्दल व कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला व बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत पुनरागमनासाठी तयार असल्याचे संकेतही दिले.

सामन्यातील कामगिरीचा व्हिडीओद्वारे दाखला देत ट्वीटमध्ये शमी म्हणाला, "संघाच्या यशात योगदान देणे हा नेहमीच अभिमानाचा क्षण असतो. बंगालच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच्या प्रवासाचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे. सर्व खेळाडू आणि संघ कर्मचाऱ्यांना त्यांच्या अतुलनीय प्रयत्नांसाठी खूप कौतुक. चला एकत्रपणे लढत राहूया!"

त्याने आज चंदीगडविरूद्धच्या सामन्यात फटकेबाजी केली. दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १७ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर एक विकेटही घेतली. संपुर्ण स्पर्धेत तो उल्लेखनीय गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. शमी पुनरागमानासाठी प्रयत्न तर पूर्ण करतोय, पण BCCI त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे आमंत्रण देईल का? यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे.

त्याने एका मुलाखतीमध्ये भारतीय संघात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती व त्यासाठी तो प्रयत्नही करत आहे. दुखापतीतून पूर्णत: सावरलेला नसतानाही त्याने रणजी ट्रॉफी खेळण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे स्पर्धेदरम्यान त्याला पायाची समस्स्या पुन्हा उद्भवली होती. त्यानंतर तो सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे आणि त्याने उल्लेखनीय कामगिरी देखील केली आहे. तो मागच्या काही महिन्यापासून दुखापतीतून पुर्णत: सावरण्यासाठी व भारतीय संघात पुनरागमनासाठी NCA मेडिकल टीमकडून प्रशिक्षण घेत आहे.

दोन दिवसांपुर्वी बातमी समोर आली आहे की, शमी शेवटचे दोन सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये उपस्थित राहाणार आहे. त्याला ला NCA मेडिकल टीमकडून फिटनेसबाबत ग्रीन सिग्नल मिळाला असून तो मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धा पूर्ण करून ऑस्ट्रेलियात जाईल, अशी सुत्राकडून माहिती मिळाली. १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ब्रिस्बेन कसोटीदरम्यान शमी ऑस्ट्रेलियात दाखल होण्याची शक्यता आहे, तर चौथ्या कसोटीत तो (२६ डिसेंबर) मेलबर्नमध्ये भारतीय संघात दिसेल, असे सुत्रांकडून समजत आहे.

ऑस्ट्रेलियात दुसऱ्या कसोटीत सपाटून मार खाल्यानंतर मोहम्मद शमीची उणीव अधिक तीव्र होऊ लागली आहे. हाच शमी मायदेशात मुश्ताक अली राष्ट्रीय द्वेन्टी-२० स्पर्धेत खेळत आहे आणि त्याने आज ताशी १३९ किमी वेगाने मारा केला. २४ पैकी १३ चेंडू निर्धाव टाकले. एक विकेट मिळवली इतकेच नव्हे तर फलंदाजीत १७ चेंडूत ३२ धावांचा तडाखा दिला. त्यामुळे बंगालने चंदिगडवर निसटता विजय मिळवला वर्षभरानंतर पुनरागमन करणारा शमी दोन रणजी सामन्यांत खेळला. त्यानंतर या मुश्ताक अली स्पर्धेत गेल्या १६ दिवसांत आठ सामने खेळला. आपल्या कोट्याची पूर्ण षटके त्याने गोलंदाजीही केली तरी आंतरराष्ट्रीय पुनरागमन कधी करणार हे अनिश्चित आहे.
 
ऑस्ट्रेलियात बुमरावरचा ताण कमी करण्यासाठी शमीची नितांत गरज जाणवत आहे; मात्र एकीकडे तो सामन्यांत खेळून मॅच फिटनेस दाखवत असतानाही बीसीसीआयकडून अजून त्याच्या आंतरराष्ट्रीय तंदुरुस्तीबाबत भाष्य केले जात नाही. आज झालेल्या सामन्यात शमीने अनुभवी संदीप शर्मा टाकत असलेल्या अखेरच्या षटकात तब्बल १९ धावा फटकावल्या. त्यामुळे बंगालने प्रथम फलंदाजीत ८ बाद ११४ वरून ९
बाद १५९ अशी मजल मारली. यात त्याने दोन षटकार आणि तीन चौकार मारले.

असा होतोय बदल 
३६० दिवसांनंतर पुनरागमन करणाऱ्या शमीचे वजन काहीसे वाढलेले जाणवत होते; तरीही त्याने मध्य प्रदेशविरुद्धच्या त्या रणजी सामन्यात ४२ षटके गोलंदाजी केली होती. आज त्याची शरीरयष्टी पूर्वीप्रमाणे दिसून येत होती तसेच चेंडूही तो सीमवर टाकत होता. पहिला रणजी सामना खेळल्यानंतर त्याची तंदुरुस्ती किती राहते हे तपासले जात होते, पण त्यानंतर तो दुसऱ्या सामन्यातही सहभागी झाला होता. या पुनरागमनानंतर शमीने रणजी सामन्यांत ४२.३ षटके तर मुश्ताक अली स्पर्धेत ३१.३ षटके गोलंदाजी केली आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter