अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. आधी भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर केलं. आता थेट स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. एमर्जिंग एशिया कप स्पर्धेतील फायनलचा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला. यासह पहिल्यांदाच या स्पर्धेची ट्रॉफी उंचावली आहे.
अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १३४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने १८.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना सेदीकुल्लाहने ५५ चेंडूंचा सामना करत ५५ धावांची शानदार खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचला. यासह करीम जनतने ३३ धावांची खेळी केली. तर रसूलीने २० चेंडूत २४ धावांची खेळी केली.
शेवटी फलंदाजी करताना मोहम्मद ईशाकने ६ चेंडूंचा सामना करत १६ धावांची शानदार खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला चांगली सुरुवात करता आली नव्हती. सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. मात्र त्यानंतर फलंदाजांनी कमबॅक केलं आणि सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना इशान मलिंगा, दुशान हेमंथा आणि सहान आरासिंघेने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. तर श्रॉलंकेच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेला २० षटक अखेर ७ गडी बाद १३३ धावा करता आल्या. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना सहान आरासिंघेने तुफान फटकेबाजी करत ६४ धावांची शानदार खेळी केली. तर विमुखीने २३ धावांचे योगदान दिले.