एक तपानंतर भारतीय संघ बनला चॅम्पियन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
भारतीय क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट संघ

 

मागील वर्षी जून महिन्यात द्वेन्टी-२० विश्वकरंडक जिंकणाऱ्या रोहित शर्माच्या भारतीय संघाने विश्वविजेतेपदाचा आणखी एक शिरोमणी मिळवला आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत न्यूझीलंडचे आव्हान मोडून काढत भारताने तिसऱ्यांदा हा करंडक उंचावला. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बोलताना रोहित शर्माने, 'आता चॅम्पियन्स करंडकही जिंकून वानखेडे स्टेडियमवर आणू', असा शब्द दिला होता, तो त्याने खरा करून दाखवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला २५१ धावांवर रोखल्यानंतर भारताने हे आव्हान ४९ षटकांत पार केले. कर्णधार रोहित शर्मा आघाडीवर राहून लढला. तडफदार आणि प्रसंगी संयमी अशी त्याने ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या ४८ आणि अक्षर पटेल, के. एल. राहुल यांनी सावध पावले टाकत विजेतेपद मिळवून दिले.

या चॅम्पियन्स स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला दोनदा हरवले. सलग १५ सामन्यांत नाणेफेक गमावणाऱ्या रोहित शमनि सामने जिंकण्यातले आपले सातत्य मात्र कायम ठेवले. 

याच न्यूझीलंड संघाकडून भारताचा कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पराभव झाला होता. तसेच २०१९ च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाची चव चाखावी लागली होती. आजही काही काळ प्राण कंठाशी आले होते, पण रोहितच्या शिलेदारांनी विजेतेपदाचे स्वप्न अखेर साकार केले.

भारताने २००२ या चॅम्पियन्स स्पर्धेत श्रीलंकेसह संयुक्त विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर २०१३ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली हा करंडक जिंकला होता. कमालीची उत्सुकता असलेल्या आजच्या अंतिम सामन्यात २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी १०५ धावांची सलामी दिली होती. परंतु त्यानंतर गिल व विराट कोहली पाठोपाठ बाद झाल्यावर चिंता वाढली होती. न्यूझीलंड फिरकी गोलंदाजांनी भारतीयांना जखडून टाकले होते. त्याचा परिणाम रोहित शर्माची विकेट जाण्यात झाला होता. पण श्रेयस अय्यर, के. एल. राहुल यांनी विजेतेपद निसटू दिले नाही.

तब्बल एका तपानंतर भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स करंडकात विजेता ठरला. महेंद्रसिंह धोनीच्या भारतीय संघाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक पटकावला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने पुन्हा एकदा विजेतेपदाचा करंडक उंचावला. या विजयासह भारतीय संघाने २००० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अंतिम फेरीत झालेल्या पराभवाची परतफेड केली. 

भारतीय संघाच्या विजयात रोहित शर्मा (७६ धावा), श्रेयस अय्यर (४८ धावा), के. एल. राहुल (नाबाद ३४ धावा) यांच्यासह कुलदीप यादव (२/४०), वरुण चक्रवर्ती (२/४५) यांनी सिंहाचा वाटा उचलला.

२५१ धावांचा पाठलाग करणे भारतीय फलंदाजांसाठी अशक्य कामगिरी नव्हती. खेळपट्टी थोडी संथ असल्याने नव्या चेंडूवर शक्य तितक्या धावा जमा करून मग फिरकी गोलंदाजांना लक्ष देऊन खेळणे गरजेचे होते. रोहित शर्माने नेमके तेच केले. नव्या चेंडूवर त्यामानाने अनुभव कमी असलेल्या वेगवान गोलंदाजांवर रोहित शर्मान हल्ला चढवला. चेंडू थोडा जरी आखूड पडला, तर मग रोहित शर्मा क्रीजमध्ये मागे जात चेंडू सहज टोलवू लागला. मॅट हेन्रीच्या जागी खेळायची संधी मिळालेल्या नॅथन स्मिथला त्याने समोर षटकार मारून दडपणाखाली टाकले.

पाच चौकार व तीन षटकारांसह अर्धशतकी मजल मारल्यावर रोहित शर्माने जास्त भावना दाखवल्या नाहीत, कारण मधल्या षटकांचा खेळ निर्णायक ठरणार असल्याची जाणीव त्याला होती. एव्हाना शुभमन गिलसुद्धा स्थिरावला होता. १७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सलामीवीरांनी शतकी भागीदारी नोंदवली होती. मिचेल सँटनरला कव्हर्सच्या डोक्यावरून मारताना शुभमन गिलने चूक केली, कारण हवेत उडालेला वेगवान चेंडू प्लेन फिलिप्सने उंच उडी मारून एका हातात पकडला. शुभमन गिलपाठोपाठ फक्त एक धाव करून विराट कोहली पायचीत होऊन परतला तेव्हा मैदानात सन्नाटा पसरला. विराट कोहलीने मायकेल नेसवेलचा चेंडू तिरक्या बॅटने खेळायची चूक केली होती. त्याच काळात फिरकी गोलंदाजांनी एकदम टिच्चून मारा करून रोहित शर्माला मोठा फटका मारायच्या मोहात पाडले. रोहित शर्मा ७६ धावा करून राचिन रवींद्रला यष्टिचीत झाला.

भारताकडे झुकत चाललेला सामना न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी नेम धरून मारा करून रंगतदार केला. अपेक्षित धावगती ६च्या पुढे गेली. श्रेयस अय्यरने मग मोठा षटकार खेचला. प्रेक्षकांचा आनंद काही काळात मावळला, जेव्हा पहिला श्रेयस अय्यरचा सोपा झेल सुटला आणि लगेच ४८ धावांवर तो झेलबाद झाला. दर्जेदार फिरकी गोलंदाजांच्या वाट्याची षटके संपत चालली होती. मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेलने मिळून प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद करताना आपल्या २० पटकांत ७४ धावा देत भारतीय संघाला विजयासाठी खूप झगडायला लावले.

उपांत्य सामन्याप्रमाणेच शेवटची जबाबदारी के. एल. राहुल आणि हार्दिक पंड्यावर आली. मुख्य फिरकी गोलंदाजांचा मारा संपला होता आणि वेगवान गोलंदाजांना बोलवण्यावाचून पर्याय राहिला नाही. त्याचाच फायदा दोघा फलंदाजांनी बरोबर उचलला. धावगती आटोक्यात आणून विजयाकडे दमदार प्रवास केला. हार्दिक पंड्या १८ धावांवर बाद झाला, पण के. एल. राहुल (नाबाद ३४ धावा) व रवींद्र जडेजा (नाबाद नऊ धावा) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

कठीण झेल पकडण्यात आलेले अपयश आणि राचिन रवींद्रने त्याचा घेतलेला फायदा याच्या संगमामुळे न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. कुलदीप यादवने राचिन रवींद्र आणि केन विल्यमसनला पाठोपाठ बाद करून भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करायला मोठी मदत केली. चार फलंदाज बाद झाले असताना अनुभवी डरेल मिचेलने डाव सावरताना ६३ धावांची खेळी रचली. भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार कठीण झेल सोडल्याने न्यूझीलंडला डाव सावरता आला. ५० पटकांच्या अखेरीला न्यूझीलंडने सात बाद २५१ चा धावफलक उभारला.

नाणेफेक जिंकल्यावर मिचेल सैंटनरने अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मॅट हेन्री दुखापतीतून बाहेर आला नाही. गुणवान तरुण फलंदाज राचिन रवींद्रने काही काळ नजर बसायला घेतले, मग किंचित जरी चेंडू आखूड टप्प्यावर पडला तरी मागे रेलत कडक फटके मारले. त्यातून दोन वेळा राचिन रवींद्रचे कठीण झेल सुटले. एकदा मोहम्मद शमीने स्वतःच्या गोलंदाजीवर तर आणि एकदा वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने झेल सोडला. तेव्हा राचिन रवींद्र २९ धावांवर खेळत होता. वरुण चक्रवर्तनि गोलंदाजीसाठी बोलावल्यावर लगेच विल यंगला बाद केले.

न्यूझीलंडची भिस्त असलेली केल विल्यमसन-राचिन रवींद्रची सर्वात मोलाची जोडी मैदानावर दिसू लागली. मोहम्मद शमीने सलग पाच पटकांचा मारा केल्यावर रोहित शर्माने कुलदीप यादवला गोलंदाजीला आणले. कुलदीप यादवने कमाल केली पहिल्याच चेंडूवर त्याने राचिन रवींद्रला भन्नाट गुगली अचूक टप्प्यावर टाकून बोल्ड कैले. नंतर पुढच्या षटकात केन विल्यमसनला लेग स्पीन टाकून स्वतःकडेच झेल द्यायला कुलदीप यादवने भाग पाडले. दोन मोठे अडसर भारताड्या मार्गातून कुलदीप यादवने दूर केले होते. जेंव्हा रवींद्र जडेजाने टॉम लॅथमला

पायचीत केले, तेव्हा चार बाद १०८च्या नाजूक अवस्थेत डरैल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स एकत्र आले. 

डरेल मिचेलने गरज लक्षात घेत धोका न पत्करता एकेरी धावांवर भर देत फलंदाजी केली. ३८ धावांवर डरैल मिचेलचा कठीण झेल रोहित शमनि सोडला. भागीदारीने अर्धशतकी मजल पार केली होती आणि धोका वाढू लागला होता. त्याच वेळी वरुण चक्रवर्तीला गोलंदाजी करायला आला आणि त्याने ग्लेन फिलिप्सला बोल्ड केले. ४० षटकांत १७२ धावा जमा झाल्या होत्या. शेवटच्या १० घटकांत किमान ८० धावा वाढवायची सगळी भिस्त नाबाद डरेल मिचेलवर होती.

डरैल मिचलने ४६व्या पटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर १० धावा वसूल केल्यावर वेगात बदल करून मोहम्मद शमीने फलंदाजाला फसवले. ६३ धावा करून डरैल मिचेल तंबूत परतला. कुलदीप यादवने सर्वात जास्त परिणाम साधणारा मारा करताना १० षटकांत ४० धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. तळात फलंदाजीला येऊन मायकेल ब्रेसवेलने केलेल्या नाबाद अर्धशतकाने न्यूझीलंडला ५० षटकांच्या अखेरीला सात बाद २५१ धावा उभारता आल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताने शतकीय भागीदारी केली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन संघासाठी दिले. खेळाडूंच्या या योगदानामुळे आज भारतीय संघ एकही सामना न गमावत जगज्जेता बनला. 

सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “खूप छान वाटत आहे. आम्ही या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये शानदार खेळ दाखवला आहे आणि निकाल आमच्या बाजूने आला आहे. हे खूप चांगले झाले. मी सुरुवातीपासूनच स्पष्ट होतो की पहिल्या पाच-सहा ओव्हरमध्ये आपल्याला कसा खेळ करायचा हे महत्त्वाचे आहे. मी आधीही अनेक वेळा लवकर बाद झालो आहे, पण प्लान नुसतं विचारांत न ठेवता प्रत्यक्षात आणणं खूप गरजेचं आहे. फलंदाजीमध्ये गती आणि खोली मिळाल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला.”

पुढे तो म्हणाला, “एक गोष्ट सांगून टाकतो, मी आज काही निवृत्त होत नाहीये. कुठल्याही अफवा पसरू नये, म्हणून आधीच स्पष्ट करून टाकतो. मी कुठेच जात नाहीये.”

हा सामना झाल्यानंतर विराट कोहली म्हणाला, “न्यूझीलंड एक शानदार टीम आहे, आणि आम्ही पाहिलंय की इतके कमी पर्याय असतानाही ते किती जबरदस्त खेळतात. मला माझा मित्र केन विल्यमसनसाठी जरा वाईट वाटतंय. पण ते जिंकतात तेव्हा मीसुद्धा पराभूत टीमचा भाग राहिलोय. आमच्यात प्रेम आणि आदर आहे.” 

 भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या म्हणाला, “आयसीसी इव्हेंट जिंकणे नेहमीच खूप खास असतं. मला २०१७ च्या फायनलची आठवत आहे. त्या वेळी आम्ही जिंकलो नव्हतो. पण इथे यश मिळवून खूप चांगलं वाटत आहे. के. एल. राहुलने खूप संयमाने फलंदाजी केली. योग्य वेळी त्यांनी चान्ससुद्धा घेतले. त्याच्यात अप्रतिम टॅलेंट आहे आणि त्याची टाइमिंग खूप छान आहे.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter