अफगाणी महिला क्रिकेटपटू देणार तालिबानला धक्का

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अफगाणिस्तानच्या पुरूष संघाने नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत सेमी फायनल पर्यंत मजल मारली होती. इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानचा सेमी फायनलमध्ये पोहचला होता. या दैदिप्यमान कामगिरीनंतर आता अफगाणिस्तान महिला क्रिकेटपटूंनी आयसीसीकडे एक कळकळीची विनंती केली आहे.

अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंनी आयसीसीकडे ऑस्ट्रेलियात निर्वासित संघ तयार करण्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तानच्या १७ माजी महिला क्रिकेटपटूंनी आयसीसीशी संपर्क केला आहे. त्यांनी आयसीसीला विनंती केली आहे की ऑस्ट्रेलियात त्यांचा निर्वासित संघ स्थापन करण्याची मागणी केली आहे.

अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटूंनी आयसीसी चेअरमन ग्रेग बार्कले यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी निर्वासित संघ म्हणून पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी आर्थिक मदत करण्याची विनंती देखील आयसीसीकडे केली आहे.

अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटू आपल्या पत्रात लिहितात, 'अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटू म्हणून आम्हाला पुरूष संघाने टी20 वर्ल्डकपमध्ये केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे. आम्ही राशिद खान आणि त्यांच्या संघाचे सेमी फायलनपर्यंत धडक मारल्याबद्दल अभिनंदन करतो.'

'मात्र आमच्या वेदना या कायम आहेत. कराण महिला असल्यानं आम्हाला आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करता येत नाहीये. आम्ही अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटू आता विदेशात राहतो.'

'आम्ही अफगाणिस्तान महिला संघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. आम्ही आयसीसीला विनंती करतो की त्यांनी आम्हाला ऑस्ट्रेलियात निर्वासित संघ स्थापन करण्यासाठी मदत करावी.'