इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने एक कॅप्ड व तीन अनकॅप्ड खेळाडूंना करारबद्ध केले.आज त्यांच्या खात्यात २६.१ कोटी शिल्लक राहिले होते आणि त्यांना ७ परदेशी खेळाडूंसह १६ खेळाडूंना आणखी करारबद्ध करायचे होते. त्यामुळे त्यांनी आज पटापट खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी जोर लावला.
आज त्यांनी दीपक चहरसाठी ९.२५ कोटी रुपये मोजले, जी त्यांची या ऑक्शनमधील दुसरी सर्वोत्तम बोली आहे. काल त्यांनी ट्रेंट बोल्टसाठी १२.५० कोटी मोजले होते. त्यानंतर त्यांनी अल्लाह गझनफर या १८ वर्षीय मिस्ट्री स्पिनरसाठी ४.८० कोटी मोजून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रायन रिक्लेल्टनला १ कोटींच्या मुळ रकमेत त्यांनी संघात घेतले.
अल्लाह गझनफरने ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीत ऑक्शनमध्ये नोंदणी केली होती. अफगाणिस्ताचा फिरकीपटू गेल्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एक भाग होता, पण तो स्पर्धेत पदार्पण करू शकला नाही. २०२३ आणि २०२४ च्या आयपीएल लिलावात तो अनसोल्ड राहिला होता. पण, मुजीब उर रहमानच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून KKR ला त्याला करारबद्ध केले.
त्याने या वर्षाच्या सुरुवातीला वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि बांगलादेशविरुद्ध सहा विकेट्स घेत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला.इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्ये अफगाणिस्तानच्या विजयी मोहिमेतही गझनफरची कामगिरी प्रभावी होती. त्याने या स्पर्धेत चार सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आतापर्यंत १६ ट्वेंटी-२०त २९ विकेट्स घेतल्या आहेत.
IPL 2025 च्या लिलावात अल्लाह गझनफरला मुंबई इंडियन्सने ४.८० कोटी रुपयांना विकत घेतले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने बोली वाढवण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने पहिली बोली लावली.काही काळानंतर RCBने माघार घेतली आणि त्यांची जागा मुंबई इंडियन्सने घेतली. पाच वेळा आयपीएल विजेत्यांनी विजयी बोली लावली. अल्लाह हा मुंबई इंडियन्ससोबत नेट बॉलर म्हणून होता.
२०२० च्या COVID-19 साथीच्या काळात अल्लाहने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अल्लाह गझनफरचा जन्म २० मार्च २००६ रोजी अफगाणिस्तानच्या झुरमत जिल्ह्यात झाला होता. ६ फूट २ इंच उंच असलेला अल्लाह सुरुवातीला वेगवान गोलंदाजीकडे वळला होता. पण, माजी कर्णधार दौलत अहमदझाईने त्याला फिरकी गोलंदाजीची ओळख करून दिल्याने त्याच्या कारकिर्दीच्या दिशेने एक मोठा बदल झाला.