आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला ८ धावांनी धक्का देत थरारक विजय मिळवला. अफगाणिस्तानने इब्राहीम जादरानच्या १७७ धावांच्या भेदक खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर ३२६ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने या लक्ष्याचा पाठलाग करत ४९ ओव्हरमध्ये ३१३ धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये १३ धावांची गरज असतानाही अफगाणिस्तानने १ विकेट घेत विजय साकारला.
इंग्लंडची बॅटिंग आणि अफगाणिस्तानची गोलंदाजी
इंग्लंडकडून जो रूटने १२० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंडला इतर फलंदाजांनी टिकू दिले नाही. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर (१४), बेन डकेट (३८), हॅरी ब्रूक (२५), कॅप्टन जोस बटलर (३८), लियाम लिव्हिंगस्टोन (१०), जेमी ओव्हरटन (३२) धावा केल्या.
अफगाणिस्तानच्या अझमतुल्ला ओमरझईने ९.५ ओव्हरमध्ये ५८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबीने २ विकेट्स घेतल्या. तर फझलहक फारुकी, राशिद खान आणि गुलाबदीन नईब यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली
अफगाणिस्तानची शानदार फलंदाजी
अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली. सुरुवातीला इंग्लंडने अफगाणिस्तानला 3 बाद 37 अशी नाजूक स्थिती केली. पण इब्राहीम जादरानने १७७ धावा केल्या आणि अफगाणिस्तानने ५० ओव्हरमध्ये ३२५ धावा केल्या. झाद्रानने १४६ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह १७७ धावा केल्या. त्याला हशमतुल्लाह शाहीदी आणि मोहम्मद नबी यांनी ४०-४० धावा करून चांगली साथ दिली.
इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ३ विकेट्स घेतल्या, लियाम लिव्हिंगस्टोनने २ , आणि जेमी ओव्हरटन व आदिल रशीद यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. अफगाणिस्तानच्या या ऐतिहासिक विजयामुळे इंग्लंडचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात आले असून अफगाणिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची आशा कायम आहे.
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सामना हा अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो सामना असणार आहे. जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर हा संघ सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र हा सामना गमावला किंवा पावसामुळे रद्द झाला तर, अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. तर भारतीय संघ ग्रूप ए मधून अव्वल स्थानी पोहचेल. अफगाणिस्तानचा संघ ग्रुप बी मध्ये दुसऱ्या स्थानी राहिला तर, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमीफायनलचा सामना होऊ शकतो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter