बिबवेवाडीतील डॉक्टर स्नेहल पाटील या त्यांच्या ६० वर्षांच्या आई आणि पाच वर्षांच्या चिमुकलीला घेऊन धावताना दिसल्या. या तीन पिढ्यांना एकत्र धावताना बघून इतर स्पर्धकांमध्येदेखील उत्साह निर्माण झाला. निश्चित ध्येय गाठण्याच्या इच्छाशक्तीमुळे त्या तिघींनीही तीन किलोमीटरचा टप्पा पार केला, असे डॉ. स्नेहल पाटील यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, "आमची ही पहिलीच मॅरेथॉन होती व आम्ही या वेळेस तीन किलोमीटर धावू शकलो. खूप आनंद होत आहे की माझी आईदेखील एवढे अंतर पार करू शकली. पुढच्या वेळी आम्ही पाच किलोमीटरच्या शर्यतीत धावणार आहोत." डॉ. स्नेहल यांच्या आई सुरेखा यादव म्हणाल्या, "मी पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे मला वेगळीच ऊर्जा मिळाली. यापुढे दररोज व्यायाम करण्यावर भर देणार आहे."
■ हाच आहे भारत...
या मॅरेथॉनमध्ये एका कुटुंबीयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. वसीम शेख, जे त्यांच्या पत्नी निशाद व दोन मुली झिया आणि झुनेयरा यांच्यासोबत आले होते. वसीम, जे स्वतः चक्क दुबईच्या शेखच्या वेशभूषेत आलेले. त्यांनी त्यांच्या लहान मुलींना मेरी कॉम आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेत आणले होते.झिया ही हातात बॉक्सिंग ग्लव्हज, पाठीवर तिरंगा आणि चेहऱ्यावर देशासाठी पदक जिंकण्याची भावना घेऊन मैदानात उतरली होती, तर झुनेयरा एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार, नऊवारी साडी आणि कपाळावर चंद्रकोर अशा वेशभूषेत आल्याने लक्ष वेधून घेत होती. शेख दांपत्य म्हणाले, 'आम्हाला आमच्या मुलींच्या माध्यमातून भारताच्या धाडसी नारीशक्तीचे दर्शन घडविण्याचा योग आला."
मुंबईहून पुण्यात...
डॉक्टर, सैनिक, पोलिस, उद्योजक- व्यावसायिक यांसह विविध क्षेत्रांतील नागरिक स्पर्धेला खास बनवतात. आमच्या मुंबईतील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानाबाहेर धावून आज केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही खूप संतुष्ट वाटत आहे, अशी प्रतिक्रिया हवालदार रवींद्र मंगाळकर यांनी व्यक्त केली. ते सहभागी होण्यासाठी मंगाळकर मुंबईहून मॅरेथॉनमध्ये आठ जणांच्या गटासह आले होते.