भारतात वेगवेगळ्या धर्माची व पंथाची लोक राहतात. मात्र हजारो वर्षांपासून सोबत असूनही एकमेकांच्या धर्माबद्दल त्रोटक किंवा जुजबी माहिती एकेमेकांना असते. बऱ्याचदा या अपुऱ्या माहितीमुळे अनेक पूर्वग्रह तयार होत जातात. आणि एक वेगळाच दृष्टीकोन त्यातून विकसित होत जातो. त्यामुळे मुस्लिमांविरुद्ध अतार्किक भीती आणि द्वेष वाढत जातो. यालाच इस्लामोफोबिया म्हणतात. दिवसेंदिवस इस्लोमोफोबिया वाढत चालल्यामुळे महाराष्ट्रासह भारतभर एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. हा उपक्रम म्हणजे इतर मुस्लीमेतरांना मुस्लिमांचा धर्म, त्यांचे प्रार्थनास्थळ, उपासना, धार्मिक संकल्पना यांविषयी माहिती देणे.
काही दिवसांपूर्वी असाच एक उपक्रम साताऱ्यात यशस्वीरीत्या राबवण्यात आला. त्यात खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते. रमजानच्या पार्श्वभूमीवर सध्या असाच अजून एक कार्यक्रम नुकताच संभाजीनगर येथे घेण्यात आला. 'जमात-ए-इस्लामी-हिंद'च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला होता. अधिक जाणून घेऊयात या कार्यक्रमाविषयी.
भिन्नधर्मीय समाजांमध्ये परस्परांविषयी असलेला अविश्वास कमी व्हावा, त्यांच्यामध्ये स्नेहभाव वाढीस लागावा यासाठी जमात-ए-इस्लामी-हिंदच्या नसीर जौहरी यांनी छत्रपती संभाजीनगरच्या अंगुरी बाग येथील मस्जिद-ए-अक्सा (हाजी कासिम) येथे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात 'जमात-ए-इस्लामी-हिंद'च्या सचिव फहिमुन्निसा शेख यांच्या कुराण पठणाने झाली.
याठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करत त्यांना मस्जिदची ठेवण, त्याठिकाणी होणाऱ्या नित्यक्रमाची माहिती देण्यात येत होती. पत्रकार नौशाद उस्मान यांनी या कार्यक्रमात अ़जानचा अर्थ, मस्जिदचे सामाजिक महत्त्व, तिथे कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते, त्याचे अध्यात्मिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व, उर्दू भाषा व मस्जिदच्या विविध भागांची माहिती दिली. यावेळी महिलांच्या मस्जिद प्रवेशाबाबतही चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास १३० हून अधिक महिला उपस्थित होत्या. पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, ज्येष्ठ पत्रकार रोशनी शिंपी, पत्रकार मोहसिना सय्यद, दामिनी पथकच्या निर्मला निंभोरे, महिला संघाच्या अध्यक्ष शाइस्ता कादरी साहेबा, रोहिणी शिंपी व बुशरा नाहिद साहेबा यांची विशेष उपस्थिती होती.
'मस्जिद परिचय' कार्यक्रमाबाबत नसीर सांगतात, "स्त्रियांच्या आणि एकंदरीत समाजातील विविध घटकांच्या मनात मशिदीबद्दल अनेक गैरसमज आहेत. चांगल्या समाजाची निर्मिती करायची असेल तर सर्व जाती-धर्मांमध्ये सांप्रदायिक सौहार्द आणि आदराचे नाते निर्माण व्हावे लागते. जमात-ए-इस्लामी-हिंद मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन काम करत असते. अलीकडे लोकांच्या मनात गैरसमजातून द्वेषाची भावना वाढीस लागताना दिसत आहे. कार्यक्रम ठरत असताना आम्हाला सुरुवातीला वाटले की रमजानचा महिना आहे त्यामुळे इफ्तार कार्यक्रम ठेवणे अधिक योग्य राहील. मात्र, अधिक चर्चा केल्यानंतर मस्जीदिच्या परिचयाचे महत्व ओळखत आम्ही मस्जिद परिचय कार्यक्रम घ्यायचे ठरवले. या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला." या कार्यक्रमानंतर अशा कार्यक्रमांचे आयोजन पुन्हा करावे, अशा अनेक प्रतिक्रिया लोकांकडून नसीर आणि फहिमुन्निसा यांना आल्या.
लोकांच्या प्रतिसादाबाबत फहिमुन्निसा म्हणाल्या, "प्रेक्षक आणि पाहुण्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच मशिदीला भेट देत असल्यामुळे लोकांची कुतूहलता जाणवत होती. समोरून अनेक प्रश्न विचारली जात होती. त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांच्या मनात मशिदीबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांची अधिकाधिक गरज आहे."
तर, मशिदीच्या रचनेबद्दल सांगताना उस्मान म्हणाले, "मशिदीत मौलाना जिथे उभे राहून नमाज अदा करतात, त्या समोर गोलाकार भाग असतो. ते जेव्हा प्रार्थना म्हणतात, तेव्हा सभागृहातील प्रत्येकाच्या कानापर्यंत या गोलाकार रचनेमुळे शब्द पोहोचतात." पूर्वी पुरुषांप्रमाणेच महिला देखील मशिदीत येऊन नमाज अदा करत होत्या. मात्र, मुलांच्या संगोपनाच्या जबाबदारीमुळे त्यांना घरातही नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली होती. कालांतराने महिला घरातच नमाज अदा करू लागल्या अन् त्यामुळे मशिदीत महिलांसाठी असलेली वेगळी रचना लुप्त होत गेली, अशी माहितीही त्यांनी दिली.
सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती टाकल्यावर नसीर आणि फहिमुन्निसा यांना अनेक कॉल्स आणि मेसेजेस आले. लोकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळाला. चांगल्या समाजासाठी आपण सर्वांनी सर्वांचा आदर केला पाहिजे. परस्पर सहकार्याने आणि विचाराने जगले पाहिजे, अशाही प्रतिक्रिया समाजातील विविध धर्मीय लोकांकडून त्यांना देण्यात आल्या. भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे नसीर यांनी सांगितले.
दरम्यान रोजामध्ये पहाटेची सहेरी व संध्याकाळच्या इफ्तारला सर्वांनी एकत्र मिळून मिष्ठान्नाचा आस्वाद घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे पहिल्यांदाच संभाजीनगर शहरातल्या सर्वधर्मीय महिलांसाठी इफ्तारचे आयोजन केले होते. इफ्तारचा हिंदू व मुस्लिम महिलांनी एकत्रितपणे आस्वाद घेतला.
काय म्हणाल्या उपक्रमात सहभागी महिला?
दामिनी पथकच्या निर्मला निंभोरे म्हणाल्या, "मशिदीत महिलांना प्रवेश निशिद्ध असतो, ही मान्यता या उपक्रमामुळे नष्ट झाली. विशेष म्हणजे एका मशिदीत हिंदू-मुस्लिम एकत्रितपणे इफ्तारचा आनंद घेतात, हे दृश्यच अद्भुत आहे." तर, मनपा कर्मचारी रेणुका काथार म्हणाल्या, "या कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच मशिदीत पाय ठेवला. मशीद कशी असते, यामध्ये असलेल्या पद्धतींची कारणे काय आहेत, हे प्रथमच पाहिले. अत्यंत प्रेम, आदराने या महिलांनी आमच्यासोबत केलेला इफ्तार कायम लक्षात राहील." गृहिणी हर्षाली कथार म्हणाल्या, "महिलांना प्रवेश नसतो, त्यात हिंदू महिलेला मशिदीत जाण्याचा विचारच येऊ शकत नाही. आज आम्ही सगळ्या भीत भीत आत पाऊल ठेवले, पण जाताना आत्मविश्वासाने जातो आहे. एकमेकांच्या धर्माला समजावून घेतले, तर समाज आनंदी राहील."
काय आहे 'जमात-ए-इस्लामी-हिंद'?
जमात-ए-इस्लामी-हिंद ही सामाजिक विषयांवर काम करणारी संस्था आहे. अध्यात्म, आंतरधर्मीय समाज, संशोधन, शिक्षण, सामाजिक विकास, धोरणात्मक समस्या, मूल्य-आधारित राजकारण, न्याय आधारित अर्थव्यवस्था या विषयांवर संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते. इस्लामचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सामाजिक सुधारणा करून समाजाची पुनर्रचना करण्याचा 'जमात-ए-इस्लामी-हिंद'चा ध्यास आहे. समाजातील वंचित आणि शोषित घटकांना आवाज देण्याचा प्रयत्न 'जमात-ए-इस्लामी-हिंद'च्या माध्यमातून होतो. तसेच, भारतातील अल्पसंख्याकांच्या समस्यांकडे देखील ते लक्ष वेधतात. लोकशाही, मानवी हक्क, वैश्विक बंधुता आणि जातीय सौहार्द यांच्या संवर्धनासाठी संस्था सक्रिय आहे.
- छाया काविरे