मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही - अजित पवार

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 2 d ago
 राष्ट्रवादीच्या दावते-ए-इफ्तार कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रवादीच्या दावते-ए-इफ्तार कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार

 

इस्लाममध्ये पवित्र मनाला जाणार रमजान महिना संपत आला आहे. अवघ्या काही दिवसांवर ईद आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरुन अस्थिरता निर्माण होत आहे. रमजानचा पवित्र महिला सुरू असल्याने प्रशासन खबरदारी घेत आहे. रमजानच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष इफ्तारचे आयोजन करत असतात. यातीलच के पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी. 

गेल्या इंक वर्षांपासून राष्ट्रवादी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारचे आयोजन करत आहे. ही परंपरा कायम ठेवतं अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीकडून राज्याच्या विविध भागात दावते-ए-इफ्तारचे आयोजन केले जात आहे.गेल्या २१ मार्चला मुंबईतील मरीन लाईन्सया भागात राष्ट्रवादीचा पहिला दावते-ए-इफ्तार पार पडला. या इफ्तार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार,  प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह नवाब मलिक, मंत्री हसन मुश्रीफ, छगन बुजबल यांच्यासह मुस्लिम धर्मगुरू आणि समाज बांधव उपस्थित होते. 

या इफ्तारविषयी माहिती देताना अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहले, “रमजान निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये सहभागी झालो. या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदानं सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो.” 

  
खासदार प्रफुल पटेल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहले, “मुंबईतील मरीन लाईन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या दावत-ए-इफ्तारमध्ये सामील झालो. हा खरोखरच एक खास मेळावा होता. याठिकाणी सर्व समुदायांचे लोक एकत्र आले होते. त्यांनी बंधुभावाची आणि सौहार्दाची भावना साजरी केली. असे क्षण आपली एकता मजबूत करतात. सर्वांना रमजानच्या शुभेच्छा!

 
मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही 
या दावते-ए-इफ्तार कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “रमजान हा समता, त्याग, समर्पण आणि बंधुत्वाची भावना निर्माण करणारा पवित्र महिना आहे. रमजान केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. रमजान आपल्याला त्याग, एकता आणि बंधुत्वाची संदेश देतो. भारत विविधतेमध्ये एकतेच प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांनी जातींना एकत्र घेऊन समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्याला हाच वारसा पुढे न्यायचा आहे.”

पुढे ते म्हणाले, “दोन गटात भांडण लावणाऱ्याला आणि मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही. तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या पाठीशी आहे.”  

औरंगजेबच्या कबरीबाबत अजित पवारांची स्पष्ट भूमिका 
गेल्या १७ मार्चला नागपुरमध्ये मोठा हिंसाचार झाला. यामध्ये सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. हा हिंसाचार औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून झाल्याचे भासवण्यात आले. आज नागपूरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यातच आता अजित पवार यांनी औरंगजेबच्या कबरीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८०ला झाला. ३५० वर्षांपूर्वीचा तो काल होता. आता आपण २०२५मध्ये आहे. ती कबर पूर्वीपासून तिथे आहे. ती काही आज आली नाही. मुद्दे मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु उगाच जुने मुद्दे काढले जातात. त्यातून नवे प्रश्न उभे राहतात आणि चर्चा होती. राज्यसमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. औरंगजेबासारख्या मुद्द्यांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. ती बिघडू न देता सामाजिक आणि धार्मिक सौहार्द आपण टिकवले पाहिजे.” 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter