मुस्लिम वर्ल्ड लीगचे प्रमुख डॉ. मुहम्मद बिन अब्दुल करीम अल-इसा
भारतीय वंशाचे प्रसिध्द ब्रिटीश लेखक सलमान रुश्दी यांच्यावर मागील वर्षी जीवघेणा हल्ला झाला. या हल्यामुळे संपूर्ण जग हादरले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुस्लिम वर्ल्ड लीगचे प्रमुख डॉ. मुहम्मद बिन अब्दुल करीम अल-इसा यांनी इस्लामिक कट्टरतावाद आणि हिंसा यांचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. यावेळी त्यांनी ठासून सांगितले, “रश्दी यांच्यावरील हल्ला इस्लामला अमान्य आहे!”
मुस्लिम वर्ल्ड लीग या इस्लामिक संघटनेची जगभरात उदारमतवादी प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले डॉ. अल- इसा आठवड्याभरासाठी भारत भेटीवर आले आहेत. नुकतीच त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह शांती परिषदेला हजेरीही लावली. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही ते भेट घेऊ शकतात. डॉ. अल- इसा यांच्या या दौऱ्याबाबत भारतात उत्सुकतेचे वातावरण आहे. त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आणि सरकारच्या प्रमुख नेत्यांशी त्यांची चर्चा कोणत्या मुद्द्यांभोवती असेल, याविषयी अंदाज बांधले जात आहेत.
याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ कमर आगा म्हणतात की, “सौदी अरेबियासोबत आमचे संबंध चांगले आहेत. डॉ. अल- इसा मुस्लिम वर्ल्ड लीग या जागतिक संघटनेचे प्रतिनिधित्व करतात. या दौऱ्यात ते सरकारशी आणि जनतेशी ज्या मुद्द्यांवर चर्चा करतील, त्यातून आश्वासक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. ‘अफगाणिस्तानातील शांतता’ यांसारख्या प्रादेशिक मुद्द्यांवर डॉ. अल- इसा यांच्यासोबत चर्चा करणे केवळ भारतासाठीच नव्हे तर, संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण, डॉ. अल- इसा ज्या उदारमतवादी इस्लामबद्दल बोलतात , तो विचार मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद यांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.”
आगा पुढे म्हणतात, “हा दौरा आर्थिक मुत्सद्देगिरीच्या दृष्टिकोनातूनही अतिशय महत्वाचा आहे. सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था वाढत आहे. आपल्याकडे मुबलक कामगार आहेत. तसेच, अरब देशांमध्ये भारताची प्रतिमा चांगली आहे. याचा फायदा भारत आपल्या संबंधांना आणखी सुधारण्यासाठी करून घेऊ शकतो.”
वास्तविक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदारमतवादी इस्लामशी संबंधित काही महत्वाच्या व्यक्तींना भेटून काउंटर डिप्लोमसीच्या पातळीवर काम सुरु आहे. नुकतीच त्यांनी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल-करीम यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांनी सौहार्द वाढवण्याच्या आणि कट्टरतावादाचा सामना करण्याच्या मुद्यांवर चर्चा केली होती. यावेळी, देवबंद येथील दार-अल-इफ्तामध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स' उघडण्याबाबतही चर्चा झाली. शौकी गेल्या वर्षी भारतात आले तेव्हा त्यांनी अनेक शहरांना भेट दिली होती. अल डॉ. अल- इसा यांच्या भेटीकडेही अशाच मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.
मुस्लिम देशांशी भारताचे संबंध सुधारत असले, तरी काही देशांच्या बाबतीत भारतासमोरची आव्हाने अजून कमी झालेली नाही. मे महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये G-२० वर्किंग ग्रुपची बैठक झाली. भारताला सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असलेल्या तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त यांसह काही मुस्लीम राष्ट्रांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती. पाकिस्तानने याकडे त्यांच्या कुटनीतीचा विजय म्हणून पाहिले. अशा पार्श्वभूमीवर या देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याची एकही संधी गमावणे भारताला परवडणारे नाही.
डॉ. अल- इसा आणि उदारमतवादी इस्लामबद्दल सौदी अरेबियाचा बदललेला दृष्टिकोन
२०१७ मध्ये रॉयटर्स या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना डॉ. अल- इसा यांनी केलेले वक्तव्य सौदी अरेबियाच्या आजवरच्या राजकीय भूमिकेपेक्षा फार वेगळे होते. ते म्हणाले होते, “जे झाले ते झाले. आता आपल्याला कट्टरपंथीय विचारधारा उखडून टाकायची आहे. धार्मिक कट्टरता हा दहशतवादाचा प्रवेशबिंदू आहे आणि ते नष्ट करणे हे आता मुस्लिम वर्ल्ड लीगचे ध्येय आहे.”
या मुलाखतीच्या एका वर्षाआधीच डॉ. अल- इसा हे सौदी अरेबियाच्या मंत्रिमंडळात न्यायमंत्री होते. त्यांनी मुस्लीम वर्ल्ड लीगच्या प्रमुख पदाची जबाबदारी घेताच सौदी अरेबियाच्या ‘रिफॉर्म प्रोग्राम व्हिजन-२०३०’ची झालेली सुरुवात हा काही निव्वळ योगायोग नाही.सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याबाबत २०१७ मध्ये रियाध येथे झालेल्या ग्लोबल फोरममध्ये प्रिन्स म्हणाले होते, ' आम्हाला मूलतत्त्ववादाला तात्काळ संपवायचे आहे. सौदी अरेबियाला आता उदारमतवादी इस्लामच्या दिशेने परतावे लागेल.'
ही घटना मुस्लिम वर्ल्ड लीगसाठी एक टर्निंग पॉईंट ठरली. तत्पूर्वी, लीग आपल्या स्थापनेपासूनच म्हणजे १९६२ पासूनच सौदी अरेबियातील वहाबी इस्लामचा जगभर प्रचार प्रसार करण्यासाठी ओळखली जाते. वहाबी इस्लामचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी जगभरात मशिदी आणि मदरसे बांधली. त्यामुळे या संघटनेवर 'इस्लामिक कट्टरतावादाला प्रोत्साहन' दिल्याचा आरोपही करण्यात आले होते. ९/११ नंतर जग झपाट्याने बदलले आणि त्यानंतर लीगच्या प्रतिमेतही लक्षणीय बदल पाहायला मिळाले. लीगने धार्मिक सहिष्णुता व संवाद यासारख्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
डॉ. अल- इसा मुहम्मद बिन सलमान यांच्या जवळचे आहेत. सौदी अरेबियाची संयमी आणि सहिष्णू प्रतिमा निर्माण व्हावी यासाठी डॉ. अल-इसा प्रयत्नशील आहेत. न्यायमंत्री असतांना महिला आणि तरुणांशी संबंधित अनेक सुधारणा करण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते.
२०१६ मध्ये वर्ल्ड लीगच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी सुधारणांचा धडाकाच लावला. त्यामुळे प्रगतीशील धार्मिक नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली. डॉ अल- इसान यांनी २०१७ मध्ये व्हॅटिकनला भेट दिली आणि ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांच्याशी संवाद साधला. तर, २०१९ मध्ये बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी श्रीलंकेतील बौद्ध आणि मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली. एकीकडे त्यांनी रशियन ऑर्थोडॉक्स चर्चसोबतही संवाद साधला तर दुसरीकडे अमेरिकेत आणि परदेशात काम करणाऱ्या ज्यू संघटनांशी सहकार्याचे अनेक करारही केले.
डॉ. अल- इसा यांचा २४ जानेवारी २०२० रोजी पोलंडमधील ऑश्वित्ज़ दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ऑश्वित्ज़ कॅम्प हा नाझी राजवटीचा सर्वात मोठा आणि बदनाम कॉन्संट्रेशन शिबिर राहिला आहे. या छळछावणीला भेट देणारे जाणारे ते पहिले मोठे इस्लामी नेता आहेत. या दौऱ्यात २८ देशांतील धर्मगुरू सहभागी झाले होते.
अशाप्रकारे गेल्या आठ वर्षांत लीगच्या प्रतिमेला एक उदारमतवादी स्वरूप देण्यासाठी डॉ. अल- इसा यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि त्यांचे नेतृत्वही केले. इस्लामिक कट्टरतावादावर त्यांनी अनेकदा उघडपणे टीकादेखील केली आहे. ते म्हणतात की, “इस्लामच्या अनेक अनुयायांना वाटते की पश्चिमी राष्ट्र त्यांच्या विरोधात कट रचत आहेत. परंतु या मांडणीला काही आधार नाही. ही एक कॉन्सपिरसी थेरी आहे. पश्चिमेने धार्मिक राज्याची संकल्पना रद्द करून धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे, अशा परिस्थितीत ते मुस्लिमांना लक्ष्य का करतील?"
डॉ. अल- इसा यांचे आधुनिक आणि पुरोगामी विचार सौदी राजपुत्राची दूरदृष्टी आणि विधान यांच्याशी विसंगत असल्याचेही बोलले गेले. इस्लामचे उदारमतवादी रूप जनतेत विशेषतः तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय करण्यासाठी पारंपरिक माध्यमांपेक्षा सोशल मीडियावर त्यांचा अधिक विश्वास आहे. त्यामुळेच ते एकदा म्हणाले होते, इस्लामच्या प्रचारासाठी केंद्रे स्थापन करत बसण्यापेक्षा ट्विटरअधिक प्रभावपूर्ण आणि सक्षम माध्यम आहे. मार्च २०१९ मध्ये, लंडनमधील एका कार्यक्रमात डॉ. अल- इसा म्हणाले होते, ईश्वराने लोकांमध्ये विविधता निर्माण केली आहे आणि ही विविधता समजून घेणे, त्याचा आदर करणे यातच आपले शहाणपण आहे. स्त्रिया आणि हिजाब यांबाबतही त्यांनी अतिशय पुरोगामी भूमिका घेतली आहे.
उदारमतवादी इस्लामला मानणाऱ्या लोकांवर डॉ. अल- इसा यांचा मोठा प्रभाव असल्याचे बोलले जाते. तज्ज्ञांचे मते, भारतात समान नागरी कायद्याची चर्चा नव्याने सुरू झालेली असताना डॉ. अल- इसा यांच्याशी होणाऱ्या संवादातून बरेच चांगले मुद्दे बाहेर येऊ शकतात. कारण, त्यांनी अशाच अनेक कठीण प्रसंगात सरकार आणि जनता यांच्याआमध्ये संवादाचे पूल बांधण्याचे काम केले आहे. त्यांना अशा विषयांचा अनुभव आहे आणि त्यांच्या भूमिकेचे जगभरातून कौतुकही होत आहे.
- अल्पयू सिंह
(अनुवाद : छाया काविरे)
मुस्लीम वर्ल्ड लीग प्रमुख डॉ. अल-इसा यांच्या भारतभेटीशी संबंधित हे इतर लेखही वाचा :