सदानंद पाटील
मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नसताना महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले. तरीही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने पुरेशा प्रमाणात मुस्लिम समाजाला विधानसभेसाठी उमेदवारी दिलेली नाही. तर आघाडीपेक्षाही महायुतीत वाईट अवस्था आहे.
‘सबका साथ, सबका विकास’ सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय पक्षांबाबत मुस्लिम समाजात नाराजी असून, त्याचा फटका कोणाला बसणार,हे आता निकालानंतरच समजणार आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात मुस्लिम समाजाची सुमारे १२ टक्के म्हणजेच सुमारे १ कोटी ३० लाख इतकी लोकसंख्या आहे. विधानसभेच्या २३ मतदारसंघांत २० टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोणीही मुस्लिम उमेदवार दिला नाही. तरी मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केले. या मतदानाचा सर्वाधिक लाभ हा महाविकास आघाडीला झाला असल्याचे आघाडीच्या सर्वच पक्षांनी आणि नेत्यांनी मान्य केले होते.
तसेच, लोकसभेला जरी मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाली नसली तरी विधानसभेला त्याची भरपाई करण्याची ग्वाही देखील देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात जागावाटप पूर्ण झाल्यानंतर, कोणत्याही पक्षाने मुस्लिम समाजाला अपेक्षित प्रमाणात उमेदवारी दिली नाही, हे स्पष्ट झाले आहे.
अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष नसीम सिद्दीकी म्हणाले, "राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला उमेदवारी देताना सर्वपक्षीयांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे स्वाभाविकच समाजात नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत समाजाने महाविकास आघाडीला साथ दिली. तरीही विधानसभेला योग्य प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे अन्य छोट्या पक्षांमध्ये मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही."
कोणत्या पक्षात किती उमेदवार?
काँग्रेस
काँग्रेसकडून सहा मुस्लिम उमेदवार देण्यात आले आहेत. यात नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार, मीरा भाईंदर-सय्यद मुजफ्फर हुसेन, मालाड पश्चिम-अस्लम आर. शेख, चांदिवली-मोहम्मद आरिफ नसीम खान, मुंबादेवी-अमीन अमिराली पटेल तर वांद्रे पश्चिम येथून असिफ झकारिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना
शिवसेनेकडून केवळ मंत्री अब्दुल सत्तार हे एकमेव मुस्लिम उमेदवार आहेत. त्यांना सिल्लोड येथून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ८५ जागा लढवीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री नवाब मलिक यांना मानखुर्द तर त्यांची कन्या सना मलिक यांना अणुशक्ती नगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व, मुंब्रा - कळवा येथून नजीब मुल्ला, हसन मुश्रीफ यांना कागल मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांना आष्टी मतदारसंघातून तर अणुशक्तीनगर मधून फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अहमद हे समाजवादी पक्षातून शरद पवार यांच्या पक्षात दाखल झाले. त्यामुळे इच्छुक नाराज झाले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसारच अहमद यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ८७ पैकी केवळ २ जागांवर मुस्लिम उमेदवार दिले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वर्सोवा येथून हरुण खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.